‘वळण वाटा’ हे आत्मचरित्र सामाजिक दस्तऐवजःप्रा.डाॅ. रणधीर शिंदे

प्रा.विश्वनाथ जाधव यांच्या चार ग्रंथांचे प्रकाशन संपन्न
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:
‘शब्द शिवार’ प्रकाशन निर्मित प्रा. विश्वनाथ जाधव यांच्या चार ग्रंथांचे प्रकाशन आटपाडी येथे संपन्न झाले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा – आटपाडी यांच्यावतीने श्री कल्लेश्वर मंदिर सभागृहामध्ये आयोजित केलेल्या ग्रंथप्रकाशन सोहळ्यासाठी ज्येष्ठ समीक्षक डाॅ. रणधीर शिंदे (मराठी अधिविभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) उपस्थित होते.
यावेळी प्रा.विश्वनाथ जाधव यांच्या ‘वळण वाटा’-आत्मचरित्र, ‘जगावेगळी माणसं’ – व्यक्तिचित्रण,’श्रीमंत बाबासाहेब देशमुख’ – चरित्र , व ‘विश्वसाहित्यातील मानदंड’ – चरित्रात्मक अशा चार पुस्तकांचे प्रकाशन प्रमुख मान्यवरांचे शुभहस्ते पार पडले.
म.सा.प. पुणे, शाखा – आटपाडीचे अध्यक्ष अमरसिंह बापू देशमुख अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कृष्णा इंगोले, प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी, व समीक्षक डॉ. रमेश शिंदे उपस्थित होते.
प्रास्ताविक व लेखक भूमिका प्रा.विश्वनाथ जाधव यांनी मांडली. स्वागत प्रा.विजय शिंदे यांनी केले.यावेळी ‘शब्द शिवार’ प्रकाशनाचे प्रकाशक इंद्रजित घुले तसेच दादासो कुंभार,वनिता हंचे व विजय देवकर यांचा विशेष सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आला.प्रकाशन सोहळ्यानंतर डाॅ.कृष्णा इंगोले व डाॅ.सयाजीराजे मोकाशी यांनी माणदेशी साहित्यिकांची स्वतंत्र बैठक घेवून माणदेशी साहित्याच्या इतिहास लेखन व भविष्यकालीन लेखनासंदर्भात मार्गदर्शन केले.
डाॅ.रणधीर शिंदे म्हणाले, प्रा.जाधव यांनी लिहिलेले ‘वळण वाटा’ हे आत्मचरित्र म्हणजे माणदेशाचा गेल्या साठ सत्तर वर्षांचा सामाजिक दस्तऐवज आहे.यामध्ये माणदेशाचा इतिहास,भौगोलिकता,प्रदेशनिष्ठता,
शैक्षणिकता,सांस्कृतिकता, माणदेश प्रदेशाची वैशिष्ट्ये जिवंतपणे साकारली आहेत.’वळण वाटा’ या प्रा.जाधव यांच्या आठवणी असल्या तरी त्या प्रदेशाची,कुटुंबाची जीवनकहाणी आहेत. माणदेशी माणसांचा जगण्यातील संघर्ष,चिवटपणा,उदारपणा अत्यंत प्रभावीपणे अभिव्यक्त होतो. यातील आई,वडील,शिक्षक,पत्नी,मित्र यांच्यावरील आठवणी अत्यंत व्याकूळ,कृतज्ञतापूर्वक व
प्रेरणादायी आहेत. मराठी साहित्यात एका बाजूला गौरवी,आत्मप्रौढी,काल्पनिक आणि सनसनाटी निर्माण करणारी आत्मचरित्रे लिहिली जात असताना द्वितीय पुरुषी निवेदन पद्धतीचा अवलंब करुन वास्तवाला भिडणारे वस्तुनिष्ठ आत्मचरित्र लिहून प्रा.जाधव यांनी मराठी साहित्यात अद्वितीय स्वरुपाचे लेखन केले आहे. अस्सल माणदेशी भाषा, गतीशीलता, प्रवाहीपणा,अल्पाक्षरी वाक्ये , निवेदनाची प्रयोशीलता ही ‘वळण वाटा’ ची प्रमुख वैशिष्ट्य असून पुढील काळात ती मराठी आत्मकथन लेखकांना नवी दृष्टी देणारे ठरेल.
डाॅ.रमेश शिंदे ‘जगावेगळी माणसं’ या व्यक्तिचित्रणपर ग्रंथावर बोलताना म्हणाले, व्यक्तीचित्रण लिहिण्याची माणदेशी लेखकांची मोठी परंपरा आहे. माणदेशाला सामाजिक व सांस्कृतिक परंपरा असून धर्म,श्रद्धा व माणूस पण जोपासणारी व्यक्तिचित्रणे प्रा. जाधव यांच्या ‘जगावेगळी माणसं’ या व्यक्तीचित्रण संग्रहामध्ये आहेत. ही व्यक्तिचित्रणे सेवाभावी वृत्ती असणारी इथल्या मातीशी,गावगाड्याशी इमान राखणारी आहेत. पुस्तके, ग्रंथ हे नव्या पिढीसाठी दिशादर्शक व प्रेरणादायी असतात. भोवतालचा काळ झपाट्याने बदलत असताना समकालीन वास्तवाशी लेखकांनी स्वतःला जोडून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याशिवाय अस्सल व सकस लेखन लिहिता येणार नाही.
डाॅ.सयाजीराजे मोकाशी ‘ श्रीमंत बाबासाहेब देशमुख’ या चरित्रग्रंथावर बोलताना म्हणाले,चरित्रलेखनामध्ये वस्तुनिष्ठता व सत्यनिष्ठता साधणे कठीण काम असते. परंतु प्रा.जाधव यांनी ‘श्रीमंत बाबासाहेब देशमुख’ यांच्या चरित्रामध्ये ते सहज साध्य केले आहे.श्रीमंत बाबासाहेब देशमख हे विकासपुरुष होते,त्यांचे माणदेशासाठी आणि आटपाडी तालुक्यासाठी सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक व
शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अद्वितीय,अतुलनीय स्वरुपाचे आहे. तत्कालीन राजकारणामध्ये जिल्ह्याने त्यांच्यावर जाणीवपूर्वक अन्याय केला.तरीही ते सातत्याने सर्वसामान्य,दुष्काळी जनतेच्या विकासासाठी झगडत राहिले. प्रा.जाधव यांचे हे चरित्र खूपचं प्रेरणादायी आहे.
डाॅ.कृष्णा इंगोले हे ‘ विश्वसाहित्यातील मानदंड’ या चरित्रात्मक ग्रंथावर बोलताना म्हणाले, प्रा.जाधव यांनी जागतिक पातळीवरील अठ्ठावीस नामवंत महान लेखकांचे चरित्र या ग्रंथामध्ये साकारले आहे. अभ्यासकांना हे चरित्र अत्यंत महत्वपूर्ण आहे. असा प्रयोग करणारे मराठीमध्ये क्वचितच लेखक आहेत. प्रा.विश्वनाथ जाधव यांचा स्नेह आणि व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये त्यांनी सांगितली.आटपाडी हे ठिकाण माणदेशाच्या केंद्रस्थानी असून अमरसिंह देशमुख यांच्या रुपाने साहित्य आणि संस्कृतीची आस्था असणारे व्यक्तिमत्व लाभल्याचे सांगितले.
अमरसिंह देशमुख अध्यक्षीय मनोगतामध्ये म्हणाले की,माडगूळकर बंधू,शंकरराव खरात यांच्या लेखन परंपरेनंतर माणदेशी लेखक मोठ्या संख्येने वर्तमान काळात सकस लिहित व वाचत आहेत याचा अभिमान आहे.वाचनसंस्कृती जोपासली जात आहे.पुढील काळात नव्या पिढीने आणखी जोमाने लेखन करावे,अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रा.जाधव यांच्या ‘वळण वाटा’ आत्मचरित्रातून त्यांचे खरे आयुष्य कळाले,ही भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचलन प्रा.विजय शिंदे यांनी केले.आभार दिनेश देशमुख यांनी मानले. यावेळी प्रा. विश्वनाथ जाधव यांची पत्नी,मुले,सुना,नातवंडे, नातेवाईक, मित्रमंडळी,’शब्द शिवार’ चे प्रकाशक इंद्रजित घुले, प्रा.जे.आर.चव्हाण,प्रदीप पाटील, शिवाजी माळी,लक्ष्मण हेंबाडे, मच्छिंद्र ऐनापुरे, विष्णुपंत पाटील ,शहाजी पाटील, वैजिनाथ घोंगडे, शिवाजी सातपुते, शिवाजी बंडगर, ज्ञानेश डोंगरे, सिताराम सावंत, संभाजी गायकवाड, सुधीर इनामदार, मुकुंद वलेकर, लवकुमार मुळे, मेघाताई पाटील,अनिता पाटील, जोतिराम फडतरे, संतोष जगताप, रमेश जावीर, सुनील दबडे, प्रा. विजय जाधव, साहेबराव चवरे, गुलाबराव पाटील, प्राचार्य डाॅ.विजय लोंढे ,जे.के. कोडग, ऋषिकेश देशमुख, जयसिंग देशमुख, अभिजित देशमुख, प्रसादराव देशपांडे, नामदेव पाटील, चंद्रवर्धन लांडगे, प्रा.बालाजी वाघमोडे, प्रा.रामदास नाईकनवरे, अच्युतराव गिड्डे ,जुगदर, विश्वास जावीर, डॉ.विनय पत्की, विकास पाटील, प्रकाश नामदास, अॅड. राम इनामदार , अॅड.विजय सावंत तसेच माणदेशातील अनेक साहित्यिक व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.