जत येथील श्री यल्लमा देवीची यात्रा उत्साहात संपन्न!

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:

ओमायक्राॅनच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या उपस्थितीत जत येथील श्री. यल्लमादेवीची यात्रा पार पडली असून पुढील यात्रा ही १९ डिसेंबर,२०२२ ते दि.२३ डिसेंबर, २०२२ रोजी भरणार असल्याचे श्री.यल्लमादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी जाहीर केले.
महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली व नवसाला पावणारी देवी म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या श्री. रेणुका देवी( यल्लमा) चे मूळ ठिकाण हे कर्नाटक राज्यातील सौंदत्ती येथे असून श्रीमंत डफळे राजघराणेचे वंशज हे या देवीचे निस्सीम भक्त होते. ते दर पोर्णिमेला घोड्यावरून देवीच्या दर्शनासाठी जात होते.
कालांतराने डफळे राजांचे वय झाल्याने त्यांना एवढ्या दूरचा प्रवास घोड्यावरून करणे अशक्य झाल्याने त्यांनीं देवीलाच प्रार्थना केली की ‘तूच आता माझ्या राज्यामध्ये येऊन मला तूझी सेवा करण्याची संधी दे’. राजाची ही प्रार्थना ऐकून श्री. यल्लमादेवी ही मूळ ठिकाण सौंदत्ती येथून कोकटनूर मार्गे जतला आल्याची अख्यायिका आहे.
श्रीमंत डफळे सरकार यांनी जतच्या गंधर्व नदीकाठी श्री. यल्लमादेवीचे मंदिर बांधले आहे. श्री. यल्लमादेवी हे डफळे राजघराणेचे खासगी देवस्थान आहे. त्यामुळे देवीचे किच कार्यक्रमाचे दिवशी देवीचे पुजारी सुभाष कोळी हे घोड्यावर बसून आपल्यासोबत देवीची पालखी व मानाचे झग घेऊन भल्या पहाटे श्रीमंत डफळे यांच्या राजवाड्यावर आले होते.
या ठिकाणी पालखी आल्यानंतर डफळे राजघराणेचे वंशज व श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे, त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत अमृताराजे डफळे, युवराज श्रीमंत शिवांचलराजे व अनिरुध्द राजे तसेच श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जतच्या सचिव माँसाहेब श्रीमंत ज्योस्नाराजे डफळे यांनी देवीच्या पालखीचे तसेच मानाच्या झगाचे स्वागत केले.
श्री. यल्लमादेवीच्या पालखीचा मान बाबुराव कोळी यांच्याकडे असून मानाच्या झगाचा मान सुभाष कोळी पुजारी यांच्या घराण्याकडे तर काराजनगी येथील ललिता रमेश कोळी यांच्या घराण्याकडे आहे.
देवीच्या पालखीची पूजा डफळे राजघराणेचे वंशज व श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जतच्या सचिव माँसाहेब श्रीमंत ज्योस्नाराजे डफळे, श्रीमंत अमृताराजे डफळे यांनी केली व खणानारळाने देवीची ओटी भरली. तसेच देवीचे पुजारी देवीच्या मुख्य झगाचे मानकरी सुभाष कोळी,पालखीचे मानकरी बाबुराव कोळी तसेच झगाचे मानकरी ललिता रमेश कोळी यांना डफळे राजघराणेचे वतीने सन्मानित करण्यात आले.
यावेळी श्री.शाहू भोसले, पापा सनदी, सुधिर चव्हाण, श्रीकृष्ण पाटील, आदीसह अनेक भाविक भक्त उपस्थित होते.
यावेळी देवीचे दर्शन घेण्यासाठी या परिसरातील शेकडो भाविक भक्त उपस्थित होते.
डफळे सरकार यांच्या रामविलास पॅलेस राजवाड्यावर देवीच्या पालखीची व मानाचे झग यांची खणानारळाने ओटी भरल्यानंतर देवीचे पुजारी सुभाष कोळी हे घोड्यावर बसून आपल्या सोबत पालखी व मानाचे झग घेऊन नगरप्रदक्षिणा करण्यासाठी निघाले. ते देवीचे मानकरी असलेल्या जतचे पोलीस पाटील मदन मानेपाटील, दुसरे मानकरी खानविलकर,सावंत व कोठावळे या मानक-यांच्या घरी पाहुणचार घेतल्यानंतर पालखी संपूर्ण लवाजमासह मंदिर परिसरात आली.
पालखी मंदिर परिसरात आल्यानंतर पालखीचे व झगाचे मानकरी तसेच यल्लमादेवीच्या जोगम्मा यांनी डोक्यावर झग घेऊन यल्लमादेवी मंदिराच्या पाच प्रदक्षिणा घातल्यानंतर देवीची पालखी दुपारी सव्वा बारा वाजता किचाचे कार्यक्रमाचे ठिकाणी आली .
याठिकाणी प्रतिष्ठानचे वतीने आलेल्या भाविक भक्तांना किच कार्यक्रम चांगल्याप्रकारे पाहता यावा यासाठी सभोवती बॅरेकेटींग लावून परिसर बंदिस्त केला होता.जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांनी या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
या ठिकाणी कोळी समाजाच्या महिलांनी डोक्यावर घडे घेऊन अग्नीकुंडाभोवती प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर देवीचे मानकरी अरूण उर्फ बारू शिंदे यांनी देवीला बळी दिला. त्यानंतर देवीचे पुजारी सुभाष कोळी यानी धगधगत्या अग्नीकुंडात (किचात) प्रवेश केला .
यावेळी श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे,जतचे आमदार विक्रमसिंह सावंत, राष्ट्रीय काँग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे, मानकरी दिलीप तुरेवाले, बाळासाहेब जाधव,पोलीस पाटील मदन माने-पाटील त्याचप्रमाणे श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान चे कार्यकर्ते अनिल शिंदे, गणपतराव कोडग, संग्राम राजेशिर्के, मोहन माने-पाटील, कैलास गायकवाड, मेजर सुनिल चव्हाण, पापा सनदी, चंद्रकांत कोळी, महादेव कोळी, मनोहर कोळी,गणेश सावंत, प्रा.कुमार इंगळे, आदी उपस्थित होते.
श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे यानी यावेळी प्रसिद्धी पत्रकाव्दारे श्री. यल्लमादेवीच्या पुढील वर्षी भरविण्यात येणारे यात्रेची माहिती दिली.
देवीची पुढील यात्रा ही दि.१९ डिसेंबर २०२२ ते दि.२३ डिसेंबर २०२२ या कालावधीत भरणार असून सोमवार दि. १९ रोजी देवीच्या गंधोटगीचा कार्यक्रम, मंगळवार दि.२० रोजी देवीला नैवेद्य अर्पण करण्याचा कार्यक्रम तर बुधवार दि.२१ रोजी देवीचा किच कार्यक्रम त्यानंतर शुक्रवार दि. २३ रोजी अमावस्या अशी पुढील यात्रा भरणार असल्याचे जाहीर केले.
यावेळी किचाचे ठिकाणी उपस्थित असलेल्या देवदासी व जोगम्मा यांनी आपल्या हातातील बांगड्या फोडून आक्रोश केला .