
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/विटा:
जागतिक महत्त्व प्राप्त असणाऱ्या फ्रान्समधील पॅरीस शहरात भरवण्यात येणाऱ्या कान महोत्सवामध्ये नुकतीच लेखक निर्माता दिग्दर्शक दिलीप मालन बाळकृष्ण यांच्या खेंगाट या चित्रपटाची निवड अधिकृत निवड यादी मध्ये झालेली आहे. या निवडीच्या अनुशंगाने आमचे प्रतिनिधी सचिन वाघमारे यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत आमच्या वाचकांसाठी देत आहोत..
प्रतिनिधी: सर्वप्रथम चित्रपटाचे कॅप्टन म्हणून तुमचे अभिनंदन सर..
दिलीप सर: धन्यवाद..
प्रतिनिधी: आमच्या वाचकांना तुमच्या कडून खेंगाट ची जीवन कथा जाणून घ्यायला आवडेल..
दिलीप सर: खेंगाट ख-या अर्थाने तीस वर्षांपूर्वी सुरू झाला. जेव्हा मी विट्यातील बळवंत महाविद्यालयात शिक्षण घेत होतो.. माझे काही मित्र आणि मी तेव्हा पासून चित्रपटाचे स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करीत आहे.. पण खेंगाट पडद्यावर येण्यासाठी तब्बल एकशे दहा वर्षांचा कालावधी गेलेला आहे..
प्रतिनिधी: म्हणजे..
दिलीप सर: सांगतो.. आपल्या देशातील एकशे दहा वर्षांची चित्रपटसृष्टी देव, देश, धर्म आणि प्रेम या विषयांच्या पलीकडे आजही गेलेली नाही.. म्हणतात ना, अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टी कधीही नष्ट होत नाहीत तसेच आहे हे.. देव प्रत्यक्ष अस्तित्वात नाही म्हणूनच तो नष्ट होत नाही.. तर सतत आपल्या मानगुटीवर आहे.. तोंडी लावण्या पुरते आपण, भारत माझा देश आहे.. सारे भारतीय माझे बांधव आहेत असे घोकत असतो.. परंतु आपल्या बांधवालाच आपण कुठल्यातरी राज्यात, कुठल्यातरी जिल्ह्यात, कुठल्यातरी तालुक्यात, कुठल्यातरी गावात, आणि सरतेशेवटी कुठल्यातरी जातीत अडकवून मोकळे होतो.. धर्म म्हणजे एका माणसाने सांगितलेला एक विचार आहे हे विसरून माझाच धर्म कसा श्रेष्ठ यासाठी सतत अधर्म करीत राहतो.. प्रियकर प्रेयसी शिवाय दुसरे कोणतेही प्रेमचं नाही अशीच मांडणी वारंवार करून त्याचे गोडवे गातो हेच तर चालू आहे आपल्या देशातील चित्रपट क्षेत्रात..
प्रतिनिधी: मग आपल्या खेंगाट मध्ये वेगळे असे काय आहे..
दिलीप सर: (हसतात) तस म्हटलं तर, वेगळ असं काहीच नाही.. जे आहे तेच वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.. आणि मला वाटतं, त्यामुळेच खेंगाट ची निवड कान मध्ये अधिकृत निवड यादी मध्ये झाली असावी..
प्रतिनिधी: बर.. आम्हाला सांगा, खेंगाटची टिम तुम्हाला कुठे आणि कशी भेटली..
दिलीप सर: मी जेव्हा खेंगाट लिहीला तेव्हाच त्यातील पात्रे माझ्या समोर फेर धरुन नाचत होती.. मला फक्त त्यांना पकडायचे होते.. खेंगाट ची मंगी, सुप्रिया च्या रुपाने मला फेसबुक वर भेटली.. सुनील दादा जगदाळे, आबा म्हणून अंबक मध्ये वाट पाहत होते.. राजवीर ची निवड सरतेशेवटी झाली.. या चित्रपटाचे डिओपी तुषार विभुते सर मला मुंबई येथील एका नाट्यगृहात भेटले.. नंतर आम्ही दादर मधील शिवाजी पार्क येथील एका बाकड्यावर बसून स्क्रिप्ट वाचन केलं.. त्यांना ही स्क्रिप्ट आवडली आणि ते खेंगाट शी जोडले गेले.. चित्रपटाचे संगीतकार संजय महादेवन सर एका मित्राच्या माध्यमातून भेटले.. त्यांच्या मुळे एडिटर प्रमोद.. आणि डिआय करणारा राहुल गुरव तर माझा मित्रच.. राहुल मुळे केदार भेटला.. माझा प्रमुख सहाय्यक संदीप डांगेच्या माध्यमातून काही कलाकार आणि चित्रपटाचे सह निर्माते संदीप जाधव भेटले.. सुनील दादा जगदाळे अंबक, विश्वास पाटील ताकारी, शिवणीचे पोलीस पाटील बाळासाहेब पवार, मित्र लखन चौधरी, मुकेश पालांडे, आण्णासाहेब शिंदे यांच्या सहकार्याने काम सुरू झाले.. मार्ग खडतर होता पण मी चालत राहीलो.. लोकं भेटत गेली आणि सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नांच यश म्हणजे खेंगाट ची निर्मिती आहे..
प्रतिनिधी: खेंगाट शुटींग दरम्यानचे काही चांगले वाईट अनुभव सांगता येतील..
दिलीप सर: अनुभव तर खूप आहेत.. पण मी त्याच्यात चांगला किंवा वाईट असा भेद करीत नाही.. अनुभव हा अनुभव असतो.. तो आपल्याला काहीतरी देऊनच जातो.. हा त्याच्यातून आपण काय घेतो हा वेगळा मुद्दा आहे..
प्रतिनिधी: खेंगाट साठी सर्व कलाकार नवीन निवडण्याच काही कारण..
दिलीप सर: हो, एकतर मला माझं पात्र हवं होतं..केवळ कलाकार नको होते.. दुसर कारण म्हणजे, मला माझं स्वतःच प्रतिबिंब माझ्या जवळच्या लोकांच्या मध्ये बघायचं होतं..
प्रतिनिधी: कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये खेंगाट ची अधिकृत निवड यादीत निवड झाल्यामुळे काय वाटते..
दिलीप सर: अर्थातच आनंद..
प्रतिनिधी: खेंगाट हा चित्रपट का पहावा..
दिलीप सर: शिव, फुले, शाहू, बाबासाहेब हे अखंड भारताचे मार्गदर्शक आहेत.. त्यांनी दाखविलेल्या पायवाटेचे आपण जर ख-या अर्थाने प्रवासी झालो तर आपला प्रवास हा निश्चितच योग्य दिशेने होणार आहे.. आणि हा आपला भारत देश सुजलाम सुफलाम बनणार आहे.. महापुरुषांच्या विचार धारेतून निर्माण झालेली, नव्या युगाची पायवाट.. चालण्यासाठी, आपल्याला हा चित्रपट सहकुटुंब सहपरिवार जाऊन पहावा लागणार आहे..
प्रतिनिधी: धन्यवाद सर..
दिलीप सर: धन्यवाद..


संबंधित बातम्या
मराठी साहित्य मंडळाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रमोद तरळ यांना जाहीर
माडगुळे येथे उद्या शिदोरी साहित्य संमेलन
चिंचणी यात्रेनिमित्त आटपाडी आगारातर्फे जादा बसगाड्यांचे बुकिंग सुरु