

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केला असून 18 नोव्हेंबर रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे,तर 18 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. 20 डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल घोषित करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील 452 ग्रामपंचायतीच्या निवडणुका यानुसार घेण्यात येणार आहेत. तर जत तालुक्यातील 81 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित ग्रामपंचायती, समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील सार्वत्रिक निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदासह थेट सरपंच पदासाठी संगणक प्रणालीद्वारे राबवण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, सोमवार दिनांक 28 नोव्हेंबर ते शुक्रवार दिनांक 2 डिसेंबर 2022 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नामनिर्देशन पत्र मागवण्याचा व सादर करण्याचा कार्यक्रम, सोमवार दिनांक 5 डिसेंबर सकाळी 11 पासून नामनिर्देशन पत्र छाननी संपेपर्यंत छाननी, बुधवार दिनांक 7 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचे कार्यक्रम व दुपारी तीन नंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी आवश्यकता असल्यास सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी व निकाल घोषित करण्यात येणार आहे. मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील, त्यानुसार राहणार आहे. दिनांक 23 डिसेंबर 2022 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा कार्यक्रम जाहीर केला आहे.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन