अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

सौ.सुभद्रा कोळवले सरपंच,तर बापू कळवले उपसरपंचपदी विराजमान,
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माडगुळे
अजनाळे ता.सांगोला जि.सोलापूर या कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ.सुभद्रा शंकर कोळवले यांची सरपंचपदी निवड करण्यात आली. तर राष्ट्रवादीचेच बापू कळवले यांची उपसरपंच पदी नेमणूक करण्यात आली. एकूण १३ सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये गेल्या अडीच वर्षांपूर्वी निवडणूक झाली असताना या ठिकाणी राष्ट्रवादीचे सात उमेदवार विजयी झाले, तर शेकापचे सहा उमेदवार विजयी झाले. ठरल्याप्रमाणे प्रथम शेकापच्या सौ.सुजाता विष्णू देशमुख यांची सरपंचपदी निवड करण्यात आली व अर्जुन भीमराव येलपले यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली होती.अडीच वर्षाच्या कालावधीनंतर आज या दोन्ही सरपंच, उपसरपंच यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवरती आज फेर मतदान घेऊन सरपंच, उपसरपंच पदाची नेमणूक करण्यात आली.यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून पंचायत समिती सांगोलाचे हरीशचंद्र जाधव यांनी काम पाहिले. त्याचबरोबर असणारे ग्रामसेवक एस.एम.सरगर यांनी त्यांना मतदान कामात सहकार्य केले.
सरपंच पदासाठी सौ.सुभद्रा शंकर कोळवले यांचा एकच अर्ज आल्यामुळे व उपसरपंच पदासाठीही बापू कोळवले यांचा एक अर्ज आल्यामुळे दोन्ही पदे बिनविरोध करण्यात आली. यानंतर सरपंच सौ. सुभद्रा कोळवले आपल्या सत्कार समारंभात उत्तर देताना भावनावश होऊन म्हणाल्या, की राजकारणाचा कोणताही गंध माझ्या घराण्याला नसताना मला सरपंचपदाचे मानकरी बनवले. त्याबद्दल मी गावच्या सर्वांचे आभारी आहे व मला मिळालेल्या संधीचे गोरगरिबानां सोबत घेऊन सर्वांची कामे करून, राजकारण हा शब्द बाजूला ठेवून मला मिळालेल्या संधीचे सोने करु. यानंतर गावात सत्काराचा कार्यक्रम व नंतर फटाक्याच्या आतशबाजीत, ढोल ताशाच्या गजरात, डॉल्बीच्या आवाजात ,संपूर्ण गावातून सरपंच, उपसरपंच, सदस्यांची मिरवणूक काढण्यात आली,