


दुःखाचा निचरा व्हायला हवा:कवी रमजान मुल्ला
आटपाडी येथे ‘काळजातल्या कविता’ घुसल्या रसिकांच्या काळजात!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
प्रेम हा संवेदनशील विषय असून प्रेमाची नेमकी संकल्पना समजून सांगायची गरज निर्माण झाली आहे, कवी दु:खातच जन्माला येतो, दुःखाचा निचरा व्हायला हवा, असे मत नागठाणे येथील सुप्रसिद्ध गेय कवी रमजान मुल्ला यांनी आटपाडी येथे मांडले. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त वाचन कट्टा समूह व अमरसिंह(बापू) देशमुख विचारमंच यांच्या वतीने ‘काळजातल्या कविता’ या कार्यक्रमात विविध हृदयस्पर्शी व जिव्हाळ्याच्या विषयांवरील कविता सादर करताना ते बोलत होते. रमजान मुल्ला म्हणाले, आटपाडी ही साहित्यिकांची परंपरा लाभलेली भूमी आहे. त्यामुळे आटपाडीची माती ही वंदनीय आहे. सासू आपल्या सुनेला जी भाषा ओठावर बोलते, ती कवितेची भाषा असते.
बापाची वेदना सांगत असताना त्यांनी काही चुटकुलेही सांगितले.
दोन बायकांची हौस बाई होती ग गड्याला,
अन् दिवाळीच्यादिशी आंघोळ केली गं वड्याला !
कविता काळजातली म्हणून त्यांनी आईची, स्त्रीची कविता सांगितली.
पाणीयाच्या आधी बाई वळण बांधावं,
भरताराच्या वं आधी बये मराण मागावं.
बाईचा जनम जसा गाजराचा वाफा,
तिला देऊन जलम सांगा कुठं झाला नफा.
सीता पवित्र वं,
नाही रामाला वं कळालं,
वनाच्या वाटेवर चाक,त्यांचं गळालं.
राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा,
हिरकणी सीतामाई राम हलक्या दिलाचा.
सितेला सासुरवास झाला वं पदोपदी
वाकून दिला तिनं सयांना घरोघरी
देवा नारायणा माझी विनंती रे कार
बाईच्या जन्माला नको घालू वारंवार
अहेवं मी नार तिच्या नाकामध्ये नथ
भरताराच्या वं आधी गेली डंका वाजवीत.
मुलगी जन्मालाच नाही घातली तर काय होईल या संदर्भात सांगताना त्यांनी अनेक समर्पक उदाहरणे दिली. स्त्रीभ्रूणहत्य संदर्भात त्यांनी डॉ. सुदाम मुंडे यांचे उदाहरण देत ‘गर्भातल्या मुलीचे तुकडे करून कुत्र्याला खाऊ घातले जायचे’ यासंदर्भातला माणुसकीचे मस्तक पेटवणारा दाखला दिला.मुलगी जन्माला नाही घातली तर माणूस नावाचं नातं संपुष्टात येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. हे सांगत असतानाच तनिष्का नावाच्या मुलीचा
दाखला दिला. मुलीचा जन्म भाग्यवान असल्याचे त्यांनी सांगितले.
मुलगी म्हणजे गुज बोलणे, आळ्यावरच पाणी गं
सांडून जाते एक दिवस ती पुन्हा रीत्याने जगणं गं
वळणावरचा एक विसावा, पुन्हा नदीच वाहणं गं
आई बापाच्या प्रेमाविषयी बोलताना त्यांनी बापाच्या जवळ असते ती लेक आणि मुलाला आवडते ती आई असे सांगत दोघांतील श्रेष्ठत्व सांगताना ते म्हणाले
फुलामंदी फुल बाई, हुंगावं जाईचं,
फुल हुंगावं जाईचं, तसं प्रेम गं आईचं,
फुलांमंदी फुल बाई, हुंगावं चाफ्याचं,
फुल हुंगावं चाफ्याचं,तसं प्रेम गं बापाचं.
बापालाही वेदना होतात, त्या चारचौघात बोलता येत नाहीत. त्या जर पाहायच्या असतील तर पहाटे त्याची ओली झालेली ऊशी पहावी, असे म्हणत त्यांनी बापाची कविता सादर केली.
माझ्या बापाचं पाय, काट्याकुट्याचं माहेर..
प्रेम हा संवेदनशील विषय असून प्रेम म्हणजे काय? हे सांगत असताना प्रेमाची नेमकी संकल्पना समजून सांगायची गरज निर्माण झाली आहे, असे त्यांनी मत मांडले.
मातेचे, पित्याचे, आईचे प्रेम स्पष्ट करत असतानाच त्यांनी पती-पत्नीच्या प्रेमामधीलही नाते उलगडले. तारुण्यात निघून गेलेल्या पतीची वाट वार्धक्यापर्यंत पाहत असताना शेवटचा श्वास घेण्याची वेळ येते आणि ज्या वेळेस तिच्या अंगावर कावळे चोचा मारतात, त्यावेळेस…
सबकुछ खाओ कागा, चुनचुन खाओ मास,
दो नैना मत खाओ, लगी पिया मिलन की आस!
अशी प्रेमाची महती सांगून
जात्यामध्ये जीव देऊनी घास मुखी जो देतो,
त्या दाण्याला जीवन कळाले, दळणाऱ्याला नाही!
अशी जीवनाचीही महती सांगितली.
कवी दुःखातच जन्माला येतो, असे म्हणत त्यांनी शेवटी धोंडा ही कविता सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रा.सुभाष कवडे यांनी वाचन आकलन उपक्रमासंदर्भात आपली भूमिका मांडली. तसेच बापूसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यमहतीच्या आठवणी सांगितल्या.
पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.अशा कार्यक्रमातून युवा पिढीस दिशा देण्याचे कार्य सातत्याने घडविले जात आहे, या कार्यक्रमातून प्रेरणा घेण्यासारखी आहे असे मत व्यक्त करून त्यांनी बापूसाहेबांना सर्वांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
भवानी विद्यालयाचे कृष्णा हनवते व हर्षवर्धन लांडगे यांनी स्वागत गीत सादर केले. खवासपूर हायस्कूलचे साहेबराव गौतम भोसे यांचा पुस्तक वाचनाबद्दल व समर्थ प्रमोद शिरसागर या शेटफळे येथील चौथी मधील विद्यार्थ्यांचा अमरसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त ६० किलोमीटर सायकल प्रवास केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
प्रा. श्रीकृष्ण पडळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा.विजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. भवानी हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश नामदास यांनी आभार मानले.
कवी सुनील दबडे,जीवन सावंत,दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे निरीक्षक अशोक चौगुले,प्रदीप पाटील, गुलाबराव पाटील,सुधाकर इनामदार, संभाजीराव गायकवाड,सुनील भिंगे,अरविंद चांडवले प्रा.उमेश देशपांडे, भरत भोसले, सत्यवान देशमुख,दै.प्रगल्भनायकचे संपादक लक्ष्मणराव खटके, रणजीत गायकवाड, अॅड. विजय सावंत, अॅड. चेतन जाधव, संताजी लोखंडे, विठ्ठल पुकळे, डॉ.दिनेश देशमुख, सनी चव्हाण, मेघाताई पाटील, पुष्पाताई मिसाळ, सुप्रिया कदम, विठ्ठल माळी, सोमनाथ गाडे, सुनील जवंजाळ, हैबतराव पावणे, दत्तात्रय कांबळे, आदि मान्यवर उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण प्रगल्भनायक न्यूज (PRAGALBHNAYAK News) या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून करण्यात आले आहे. ते पाहण्यासाठी व प्रत्यक्ष सर्व कविता व मान्यवरांची मनोगते ऐकण्यासाठी https://www.youtube.com/channel/UC-OnrQlejYoekE2DQ0XZc2A
या लिंकचा वापर करा.



संबंधित बातम्या
मराठी साहित्य मंडळाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रमोद तरळ यांना जाहीर
माडगुळे येथे उद्या शिदोरी साहित्य संमेलन
चिंचणी यात्रेनिमित्त आटपाडी आगारातर्फे जादा बसगाड्यांचे बुकिंग सुरु