आटपाडी येथे अमरसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त वाचन कट्टा समूहातर्फे आज रमजान मुल्ला यांच्या ‘काळजातल्या कविता’ कार्यक्रम!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अमरसिंह(बापूसाहेब) देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आटपाडी येथेे आज बुधवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता सुप्रसिद्ध नामवंत गेय कवी रमजान मुल्ला (नागठाणे) यांचा ‘काळजातल्या कविता’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व साहित्य रसिकांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून आपला आनंद द्विगुणीत करावा, असे आवाहन आयोजक वाचन कट्टा समूह व अमरसिंह (बापू) देशमुख विचार मंच आटपाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
आटपाडी तालुक्याचे भाग्यविधाते श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. याचे औचित्य साधून सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह (बापूसाहेब) देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तसेच महाराष्ट्रातील विविध साहित्य संमेलनातून व कार्यक्रमांमधून रसिकांच्या काळजाचा ठाव घेणारे दीड हजारांहून अधिक कार्यक्रम सादर करणारे नागठाणे येथील सुप्रसिद्ध नामवंत कवी रमजान मुल्ला यांचा ‘काळजातल्या कविता’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कलेश्वर मंदिर सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व साहित्य रसिकांनी उपस्थित राहून आपला आनंद द्विगुणीत करावा, असे आवाहन वाचन कट्टा चळवळीचे प्रणेते डॉ.दिनेश देशमुख तसेच वाचन कट्टा समूह व अमरसिंह बापू देशमुख विचार मंच आटपाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे. परगावच्या साहित्य रसिकांसाठी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण प्रगल्भनायक न्यूज (PRAGALBHNAYAK News) या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.त्यासाठी https://www.youtube.com/channel/UC-OnrQlejYoekE2DQ0XZc2A
या लिंकचा वापर करावा.