पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेला ऐतिहासिक बारव जतन करा, अन्यथा कायदेशीर लढा उभा करू : दादासाहेब हुलगे

संजय हुलगे/माळशिरस प्रतिनिधी:

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी माळशिरस गट नं. २३६० मध्ये श्री संत ज्ञानेश्वर पालखी महामार्गाच्या लगत ऐतिहासिक बारव (विहीर) पुरातत्व विभागाचे अखत्यारित येणारे वास्तुशिल्पचे संवर्धन करण्याबाबतचे निवेदन पुण्यश्लोक अहिल्या फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब  हुलगे यांच्यावतीने माळशिरसच्या प्रांताधिकारी शमा पवार यांना दिले आहे. ‌ यावेळी राष्ट्रीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड . प्रशांत रुपनवर , नीरा देवधर संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर , व्याख्याते शरद कर्णवर आदी समाज बांधव उपस्थित होते.

सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण भारतभर विविध ठिकाणी लोकांच्या सोयीसाठी रस्त्याच्याकडेला ऐतिहासिक बारव (विहीर), आड बांधलेले आहेत श्री संत ज्ञानेश्वर पालखी महामार्गाच्या लगत माळशिरस गावचे हद्दीमध्ये घुले वस्ती जवळ पुणे पंढरपूर रस्त्याचे उत्तर बाजूस ऐतिहासिक शिल्पकलेचा नमुना पुरातन बारव बांधलेले आहे.

सदरचा बारव ही नव्या पिढीला प्रेरणादायी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या इतिहासाची साक्ष देणारी आहे तो ऐतिहासिक वारसात जपणे आवश्यक आहे. असे असताना सध्या पुणे पंढरपूर रस्त्याचे रुंदीकरण चालू आहे व त्यामध्ये संबंधित ठेकेदारांना ऐतिहासिक वारसा असलेली बारव नेस्तनाबूत करू नये अशा तोंडी विनंत्या केल्या परंतु त्याकडे ठेकेदारांनी दुर्लक्ष केलेले आहे व ऐतिहासिक वारसा संपुष्टात आणण्याच्या विचारात आहेत.

सदर बारव ही भारताच्या इतिहासातील कोरीव दगडांमध्ये बांधकाम करून शिल्पकलेचा एक आदर्श नमुना निर्माण केलेला आहे त्याची जपणूक होणे आवश्यक आहे असे असताना त्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष घालने आवश्यक आहे. सदरचा बारव ही पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी सर्वसामान्य जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येण्यासाठी निर्माण केलेली आहे त्यामुळे सदर वास्तूवर अहिल्याबाई होळकरांना मानणाऱ्या तमाम लोकांच्या भावना गुंतल्या आहेत. त्यामुळे सदर बारवेचे संवर्धन होणे आवश्यक आहे.
पुणे पंढरपूर महामार्गावर घुले वस्ती जवळ असणारी बारव रस्ता रुंदीकरणामध्ये जाऊ नये व तिचे संवर्धन करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना करून पुरातन शिल्पकलेचा नमुना जोपासण्यात यावा, ही विनंती. प्रशासनाकडून वेळेत उपाययोजना न झाल्यास व लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न झाल्यास प्रशासनाविरुद्ध योग्य त्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करून आंदोलन उभे करावे लागेल याची नोंद घ्यावी ही विनंती. अशा आशयाचे निवेदन आहे. सदर निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त सो. पुणे, जिल्हाधिकारी सो. सोलापूर, तहसिलदार सो. माळशिरस यांना देण्यात आले आहे.