देवानंद जावीर ,सांगली/ प्रतिनिधी:
खा.संजयकाका पाटील यांनी तासगाव कारखाना सुरू करण्यास आमचा विरोध नाही. कारखाना सुरू झालाच पाहिजे, मात्र २८ हजार सभासद, एक हजार कामगार आणि कारखान्यासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांचे काय? याचे उत्तर काकांनी द्यावे. तासगाव कारखाना सभासद,कामगार आणि जमीन मालक बचाव समिती स्थापन करून एन.डी.पाटील यांना भेटणार आहोत,तसेच या प्रश्नी जनहित याचिका दाखल करणार आहोत,अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.
खराडे म्हणाले,दिनकर आबाचे स्वप्न पूर्ण करण्याबरोबरच सभासद व अन्य घटकांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी रस्त्यावरील आणि न्यायालयीन लढाई आम्ही लढणार आहोत. ही लढाई लढताना सर्व पक्ष व सर्व संघटनांना बरोबर घेणार आहोत.
हा कारखाना उभा करताना सभासदांनी शेळ्या,मेंढ्या, जनावरे विकून ,कुणी बायकोचे मंगळसूत्र गहाण ठेवून तर कुणी जमिनीवर कर्जे काढून शेअर्स विकत घेतले आहेत.त्या सभासदाचे अस्तित्व काय? हा प्रश्न आहे. त्याचबरोबर अनेक कामगारांनी कारखाना उभा करण्यासाठी पदरमोड करून उभे तारुण्य कारखान्यासाठी खर्ची घातले आहे. त्यातील किती कामगारांना परत कामावर घेतले आहे? याचे उत्तर संजयकाका पाटील यांनी द्यायला हवे. त्याचबरोबर तासगाव तालुक्यात एकही सहकारी कारखाना नाही,तो उभा करण्याचे धाडस दिनकर आबा पाटील करत आहेत. त्यामुळे तूरची येथील विशेषतः मागासवर्गीय शेतकऱ्यांनी सहकाराचे मंदिर उभा करण्यासाठी स्वतः भूमिहीन होवून कारखान्यासाठी जमिनी दिल्या होत्या.त्यांचे काय? त्यांना त्यावेळी प्रत्येकाच्या मुलाला कामावर घेतो, असे सांगितले होते. आता तरी काका मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय देणार आहेत का? हा आमचा खडा सवाल आहे. तसेच कारखान्याच्या परिसरात येळावी, तुरची, निमणी यासह परिसरातील गावात द्राक्ष बागेचे मोठे क्षेत्र आहे.कारखान्याच्या धुराडीतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे द्राक्षबागा संकटात येणार आहे.त्यामुळे त्या बागांचे नुकसान होवू नये,यासाठी काय प्रयोजन केले आहे? याच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी काकांना मतदान करून खासदार केले आहे.काका सभासदांना वाऱ्यावर सोडत आहेत.तसेच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनाही वाऱ्यावर सोडणार आहेत,याचे उत्तर काकांनी द्यावे.
यामध्ये राज्य सहकारी बँकेने शंभर ते सव्वाशे कोटीची मालमत्ता असलेला कारखाना ३४ कोटीना कसा विकला? हा प्रश्न आहे. त्याला जिल्हा बँकेने कशी मान्यता दिली?याचेही उत्तर अनुत्तरित आहे.कारखान्याची जमीनच १५० एकर आहे.आता तेथून राष्ट्रीय महामार्ग जातोय. त्यामुळे जमिनीचे मूल्यांकन वाढले आहे.मग जुन्याच मूल्यांकनवर राज्य बँकेने हा कारखाना गणपती अग्रो प्रा.लि.कसा दिला? हा आमचा प्रश्न आहे. जाहीर बोली का लावली नाही?गुपचूप मांडीआडून विक्री का करण्यात आली? असे अनेक प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न घेवून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत जावू.गावोगावी सभा, बैठका घेवून जनजागृती करू. त्याचबरोबर उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करणार आहोत. या लढ्यासाठी माजी खा.राजू शेट्टी, माजी मंत्री एन.डी.पाटील यांचे मार्गदर्शन घेणार आहोत.तसेच ना.जयंत पाटील,ना.विश्वजित कदम यांनाही भेटणार आहोत. त्याचबरोबर शेकाप, काँगेस,राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, सेना ,वंचित आघाडी , रासपा, जनता दल आदीसह सर्वच पक्षांना बरोबर घेणार आहोत. तसेच सर्व सामाजिक संघटनांना आवाहन करणार आहोत. जे बरोबर येतील त्यांच्याबरोबर,जे बरोबर येणार नाहीत त्यांच्याशिवाय आम्ही ही दीर्घ पल्ल्याची लढाई लढणार आहोत. आम्ही फाटके कार्यकर्ते आहोत,पण लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आमचा संघर्ष असणार आहे. या संघर्षात सर्वांनी न्याय हक्कासाठी सहभागी व्हावे असे आवाहन करत आहोत.


संबंधित बातम्या
आधार स्वयंसहाय्यता बचत गटाचा शतकमासपूर्ती समारंभ
मंगळवेढा साखर कारखाना येथे मोळीपूजन
मागण्या मान्य न झाल्यास धुराडे पेटू देणार नाही- जिल्हाध्यक्ष महेश खराडे