मागण्या मान्य न झाल्यास धुराडे पेटू देणार नाही- जिल्हाध्यक्ष महेश खराडे

राजेवाडी साखर कारखान्यावर शेतकरी संघटनेचा मोर्चा

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क

आटपाडी

            

गतवर्षीचे २२३ रुपये तातडीने द्यावेत,चालू वर्षाची एफ आर पी एक रकमी जाहीर करावी, यासह अन्य मागण्यासाठी सद्गुरू कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धूमचक्री झाली. मागण्या मान्य न झाल्यास धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.
जिल्हाध्यक्ष महेश खराडे, तालुकाध्यक्ष विजय माने, तानाजी सागर, विठ्ठल मोरे, सोलापूर जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, सचिन पाटील, अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी मोर्चा काढण्यात आला. राजेवाडी मुख्य चौकातून मोर्चास प्रारंभ झाला.एकच गट्टी राजू शेट्टी , ऊस बिल आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे, एक रकमी एफ आर पी मिळालीच पाहिजे, कोणचा म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणा देत मोर्चा कारखाना गेटवर आला.त्या ठिकाणी पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्याच्यामध्ये जोरदार धुमचक्री झाली. शेतकऱ्यांनी गेटवरच ठिय्या मारला.याठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
आंदोलकांसमोर बोलताना जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, गतवर्षी कारखान्याने २६६० रुपये देण्याचे जाहीर केले. मात्र प्रत्यक्षात २४३७ रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना बिले दिली. अद्याप २२३ रुपये बाकी आहेत. ती रक्कम तातडीने द्यावी, त्याचबरोबर एकरकमी एफ आर पी जाहीर करावी. वजनातील काटामारी थांबवावी, तोडायला द्याव्या लागणाऱ्या पैसा बंद करावा, जर मजुरांना पैसे द्यावे लागत असतील तर कारखान्याने तोडणीचे पैसे कपात करू नयेत. रीकवरी चोरी थांबवावी. वजनकाटा आणि रिकवरी लॅब ऑनलाईन करावीत, आदी मागण्या मान्य न झाल्यास धुरडे पेटू देणार नाही असा इशारा दिला.
त्यानंतर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कर्णवर पाटील आंदोलनस्थळी आले. त्यांनी आमचा काटा व्यवस्थित असून शेतकऱ्यांनी कुठेही वजन करून आणावे, आमची कोणतीही हरकत असणार नाही अशी ग्वाही दिली.गतवर्षीचे २२३ रुपये तसेच या वर्षीची एकरकमी एफ आर पी बाबत संचालक मंडळाशी चर्चा करून निर्णय घेवू असे सांगितले. त्याचबरोबर तोडायला द्याव्या लागणाऱ्या पैशाबाबत ही योग्य निर्णय घेवू तोडनीचे पैसे मुकादम घेणार नाहीत,अशी व्यवस्था करू अशी ग्वाही दिली. यावेळी नंदकुमार माने, ईश्वर माने, संदीप शिरोते, सागर शिरोटे, सुरेश पाचोब्रे, अजित कोडग, शिवराज गायकवाड, मदन जाधव, दत्ता भोसले, आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.