प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या घाणंद हायस्कूल व प्रा.टी.ए.चव्हाण ज्युनिअर कॉलेज, घाणंद येथे नुकताच बहारदार कवीसंमेलनाचा व मनोरंजनातून प्रबोधन करणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी गझलकार सुधाकर इनामदार, सुप्रसिद्ध कवी व साहित्यिक सुनील दबडे, मराठी साहित्याचे संशोधक व अभ्यासक डॉ.रामदास नाईकनवरे, प्रा.संताजी देशमुख, घाणंद हायस्कूल व कॉलेजचे विद्यार्थी, घाणंद जि. प. प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते.
कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी सुधाकर इनामदार होते. यावेळी बोलताना इनामदार म्हणाले की, कविता म्हणजे अंतरातला जाळ , झानेशाची ओवी व तुकारामाचा टाळ असते. कविता डोळ्यातले प्रेम, काळजातली माया व कविच्या जगण्याचा पाया असते. इनामदार यांनी आपल्या भाषणात बिघडलेल्या भोवतालवर, व्यवस्थेवर व मानवी मानसिकतेवर भाष्य केले.
यावेळी सुनील दबडे यांनी शिक्षणाचा टिळा व सावित्रीची लेक या कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी बोलताना दबडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेतच आपल्यातील सुप्त कलागुणांचा शोध घ्यावा व ते गुण अभ्यास सांभाळून, परिश्रम घेऊन जोपासावेत. यावेळी त्यांनी स्वानंद, मनोरंजन व प्रबोधन हा कार्यक्रम करण्यामागे हेतू असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ.रामदास नाईकनवरे यांनी बदलत्या कुटुंब व्यवस्थेवरची ‘ वेगळं रहायचाय मला ‘ व वेड्या कविच्या जिवाला चैन पडेना या कविता सादर करून सर्वांचे प्रबोधन केले.
प्रा.संताजी देशमुख यांनी सोनू तुला सोन्याची माळ गं, ह्या गाण्याचं विडंबन सादर करून मुलांची करमणूक केली. मुंबईसारख्या ठिकाणी नवीन लग्न करून जाणाऱ्या मुलींचा कसा स्वप्नभंग होतो यावरची ‘ सून मेरी अमिना दिदी ‘ ही कविता सादर करून समाजातील सुधारणा वादाचा पर्दाफाश केला .
या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

संबंधित बातम्या
मराठी साहित्य मंडळाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रमोद तरळ यांना जाहीर
माडगुळे येथे उद्या शिदोरी साहित्य संमेलन
चिंचणी यात्रेनिमित्त आटपाडी आगारातर्फे जादा बसगाड्यांचे बुकिंग सुरु