“लाज धरा पावणं तुम्ही, जनाची- मनाची…

सहा पिढ्यांची घुंगरांची आराधना ! 
अन् तेव्हापासून गाजली ही लावणी
“लाज धरा पावणं तुम्ही, जनाची- मनाची…

पोरी तुझ्या-माझ्यापेक्षा तमाशा मोठ्ठा असतो – भाऊ मांग नारायणगावकर
✍️भाई शिवराम मासाळ
अध्यक्ष बळीराजा फाऊंडेशन
📞९९२२१७३२८४

“पोरी तमाशा तुझ्या-माझ्यापेक्षा लयं मोठ्ठा हायं!” हे शब्द लहानपणापासून आईच्या तोंडून ऐकत-ऐकत वयाच्या सातव्या वर्षी पायात चाळ बांधून आज ७० व्या वर्षीदेखील अविरतपणे सलग ६३ वर्षे एखाद्या नवतरूणीला लाजवेल अशा अदाकारीने, दिलखेचक नजरेने आपल्या संवाद फेकीच्या जोरावर त्याच ताकदीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या श्रीमती मंगलाताई बनसोडे यांना जांभुळणी गावात कार्यक्रम ठेवण्याच्या हेतूने आम्हीं गावातील काहीजण माजी चेअरमन श्री.मा.महादेव मासाळ, माजी सरपंच श्री.दादासो पाटील,मा.श्री.डी.एम.पाटील सर, माजी उपसरपंच आण्णा पावले, मा.श्री.तानाजी जाधव सर, उपसरपंच मा.श्री. दगडू जुगदर, मा.श्री.पांडूरग झंजे व मी, श्रीमती मंगलाताई बनसोडे यांना भेटलो. तेव्हा तमाशाचा सुकाळ, संघर्ष, ते तमाशाला आलेली आजची मरगळ त्यांच्या बोलण्यातून सातत्याने जाणवत होते. हे सर्व ऐकून घेतल्यावर मला मंगलाताईच्या कुटूंबातील पार्श्वभूमी समजून घेण्याचे आकर्षक लागले.तसा मी लहानपणापासून कलाप्रेमी असल्याने कलाकारांच्या बाबतीत वर्तमानपत्रात किंवा नियतकालीकात काही छापून यायचे, त्यात विशेषतः काळू-बाळू कवलापूरकर, भिका- भिमा सांगवीकर, रघूवीर खेडकर- कांताबाई सातारकर, तमाशासम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग, संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर, अमन तांबे पुणेकर यांचे लेख वाचायचो. त्यातंच श्रीमती मंगलाताई बनसोडे यांच्या करवडी गावी गेल्यानंतर समजले तमाशा काय चीज असते? एखादा तरूण नवीन व्यवसाय करू लागला तर तुम्ही-आम्हीं त्याला टोमणा देत बोलतो,तुला धंदा म्हणजे तमाशाचा फड वाटला काय?
जेव्हा आपण एखादा व्यवसाय जवळून समजून घ्यायचा प्रयत्न करतो, तेंव्हा समजते कोणतीही गोष्ट सहज बोलतो तशी नसते. मंगलाताईंच्या घरी गेल्यावर आम्हीं जांभुळणीकर मंडळी समजून घेत होतो, तंबूच्या तयारीसाठी तिथे दोन-तीन सुतार काम करत होते, मजूरांची लगबग होती,तशी कलाकारांची रंगीत तालीम सूरू होती, स्वतः नितीन बनसोडे बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष ठेऊन होते. शंभर-सव्वासे लोंकाचा संच संभाळणे सोप्पी गोष्ट नक्कीचं नसते! एकवेळ आपण वाघ, सिंह संभाळू शकतो, पण बुद्धीवादी माणसांना एकत्रित ठेवणे सर्वात अवघड काम आहे. ती तारेवरची कसरत मंगलाताईच्या घरातील सहावी पिढी अगदी जोमाने करत आहे. आपण दोन दिवस यात्रा जत्रेचा कार्यक्रम करायचा म्हटले, तर घरात येणाऱ्या पाहूण्या-राऊळ्यांना संभाळू शकत नाही.अगदी भिन्न विचारांची १००/१२५ लोकं, त्यातही २५ महिलांचा संच, त्यांचे छंद जोपासत संभाळणे म्हणजे अशक्य वाटणारी गोष्ट आहे.
श्रीमती मंगलाताई बनसोडे यांच्या प्रवासाची माहिती घ्यायचा विचार मनात आला.सध्या तमाशात काम करणारी सहावी पिढी! मंगलाताई बनसोडे यांचे पणजोबा स्व. नारायण खुडे (मांग) हे पुरूष कलाकारांचा तमाशा करायचे. तेव्हा तमाशात महिला कलाकारांच्याऐवजी पुरूष कलाकार लुगडे नेसून गवळण, बतावणी, रंगबाजी, वगनाट्य करायचे. नारायण खूडे यांच्यानंतर मंगलाताईंचे आजोबा स्व.भाऊ मांग हे दोन लाखांच्यावर लावण्या लिहणारे ‘श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असूनी ! सोवळे ठेवले घालूनि घडी !! मशाल धरली हाती तमाशाची, लाज लावली देशोधडी !!’ ह्या जिद्दीने कुबेराला लाजवील असे वैभव तमाशाच्या जोरावर पायाशी लोळवीन हा संकल्प करूनच घराबाहेर पडलेले व रंगभूमीवरील पहिली नृत्यांगना म्हणून ख्याती असलेल्या पवळा हिवरगावकरच्या गोड गळ्याने, ठसकेबाज नृत्याच्या संगतीत रंगत उभयतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले शाहीर पठ्ठेबापूराव उर्फ श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी (गाव रेठरे हरणाक्ष ता.वाळवा जि.सांगली) यांच्या तमाशात असेच नावारूपाला आले होते.
पट्टे बापूराव यांच्या निधनानंतर भाऊ मांग(खूडे) व त्यांचे चुलत बंधू बापू खूडे यांनी भाऊ -बापू नारायणगावकर तमाशा काढला व तो पुढे नावारूपाला येऊ लागला. तेव्हा विठ्ठल-रुक्मिणीच्या पंढरपूरात आषाढी एकादशीदिवशी पहाटे भाऊराव व शांताबाई ह्या दाम्पंत्याला कन्यारत्न जन्माला आले-विठ्ठालाचा प्रसाद म्हणून कन्येचे नाव विठाबाई ठेवले! अगदी लहान वयापासून ढोलकीची थाप,पायातील घुंगरूंचा आवाज कानावर पडल्याने चिमूरड्या विठाबाईच्या पायात वयाच्या पाचव्या वर्षी चाळ आले.तिच्या जोरावर तमाशा गाजू लागला. विठाबाई वयात येत होती, तेव्हाचं डोक्यावरील वडीलांचे छत्र हरपले. भाऊ खूडे यांचा मृत्यू १९५७ साली झाला, तेंव्हा त्यांनी विठाबाईला एक मंत्र दिला “पोरी तुझ्या माझ्यापेक्षा तमाशा लयं मोठा हाय” हे वचन मात्र तिने आयुष्याच्या कठीण प्रसंगात देखील सांभाळले.
पुढे आपल्या बापाचे नाव राखण्यासाठी विठाबाईने स्वत:च्या नावासह बापाच्या नावाने तमाशा सूरू केला.विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर हा तमाशा राज्यभर गाजू लागला. पुढे विठाबाईचे लग्न पुण्याच्या मारूती सावंतबरोबर झाले.
तिचा नवरा तमाशा ठरवायचा आणि विठाबाई सुपारी वाजवायची! हे अविरतपणे चालू असताना एकवेळ विठाबाई पोटूशी ( गरोदर) असताना तिच्या नवऱ्याने दारू पिऊन सुपारी घेतली. गरोदर असलेली विठाबाई स्टेजवर नाचू लागली! त्यातचं तिच्या पोटात कळा आल्या, ती स्टेजच्या पाठीमागे जाऊन बाळंत झाली, तीने आपल्या पोटाच्या गोळ्याची स्वतःच दगडाने ठेचून नाळ तोडली आणि बाळ आपल्या सासूच्या हाती देऊन पुन्हा स्टेजवर येऊन ही ओली बाळंतीण नाचू लागली. तेंव्हा प्रेक्षकांच्या लक्षात आले, थोड्यावेळापूर्वी गरदोर असलेली बाईचे पोट कसे काय रिकामे दिसते? तेव्हां प्रेक्षकांच्यातून मोठ-मोठ्याने आवाज आला
“जा विठाबाई जा,
अगं आम्हीं पण माणसं आहोत,
विठाबाई तुझे नाच गाणं थांबव,
नको असला अत्याचार,
नाही सहन होत आम्हांला,
थांबव, माझे माय, थांबव!

पण थांबेल ती विठाबाई कसली! एकदा सुपारी घेतली म्हणजे ती वाजवायचीचं! असा बापाने कानमंत्र दिला होता. तो विठाबाई अगदी जिवापाड जपत होती आणि तो तीने जपला.तेव्हां तीने गायलेली
” लाज धरा पाव्हणं तुम्हीं,
जनाची मनाची!
पोटासाठी नाचते मी,
पर्वा कुणाची!
ही लावणी अजरामर झाली..

अशा थोर विठाबाईचा लोकांनी ‘तमाशासम्राज्ञी’ म्हणून गौरव केला. त्या तमाशाच्या माध्यमातून लोकप्रबोधन करायच्या! त्यांनी भारतीय लष्करासाठी १९६२ साली नेफा बाॅर्डरवर कार्यक्रम केला होता.त्यांना एकूण पाच अपत्ये ! मंगलाताई बनसोडे, मालती इनामदार, संध्या माने व कैलास सावंत ह्यांचे स्वत:च्या मालकीचे तमाशा फड आहेत.त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता, महाराष्ट्र गौरव,असे एक ना अनेक पुरस्कार मिळाले. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्या फार हलाखीचे जीवन जगत होत्या. अखेर त्यांचा २००२ साली पुण्याच्या खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने कलाक्षेत्रात चांगले काम करणाऱ्यांना त्यांच्या नावाने दरवर्षी ‘जीवन गौरव पुरस्कार’ सुरू केला.
विठाबाई यांची कन्या श्रीमती मंगलाताई बनसोडे यांचे आजचे वय वर्षे ७० आहे. त्यांनीही विठाबाई यांनी ज्या वयात सुरूवात केली त्याच वयात, अगदी सातव्या वर्षी पायात घुंगरं (चाळ) बांधून आपल्या आईच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र पिंजून काढला. पुढे-पुढे जशी मंगला वयात येत होती तशी तमाशाला तोबा गर्दी वाढत होती, मंगलाचे लग्न तमाशा कलावंत रामचंद्र लक्ष्मण बनसोडे यांच्याबरोबर झाले आणि मंगला बनसोडे यांचा तमाशा व्हरायटी शो बरोबर वगनाट्यासाठी गर्दी खेचू लागला. मंगलादेखील आईपेक्षा कुठं कमी नव्हती. तिच्या तमाशामुळे खऱ्या अर्थाने तमाशाला प्रेक्षकवर्ग वाढला. तिचा नवऱ्याने बापू बिरू वाटेगावकर यांचे वगनाट्य लिहिताना जेलमध्ये जाऊन बापूंना समजून घेतले. वारणेचा वाघ असे अनेक वगनाट्य केली. मंगलताई सांगत होत्या,आम्ही लाईट नसताना गॅसबत्तीच्या उजेडात तमाशा केला, मातीचे स्टेजचा वापर, बैलगाडीतून प्रवास केला.दहा मैलांवर तमाशासाठी जाताना अनेक संकटे येत. एकाच साडीला वेगवेगळे रंग लावून कार्यक्रम करायचो. आता तमाशा बदलला, प्रेक्षक बदलेले, आता तीनशे किलोमीटरचा प्रवास करून कार्यक्रम करतोय.
माझा दोन नंबरचा मुलगा नितीन हा कवठेमहांकाळच्या राहूटीत “जावळीत फडकला भगवा झेंडा” हे वगनाट्य सूरू असताना जन्मला! त्यानंतर मला मिरजेच्या सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. अशा अनेक संकटांवर मात करत इथंपर्यंत प्रवास केला आहे. तमाशात आज १००/१२५ लोकं आहेत. काही कलाकार लखनौचे देखील आहेत. बिगारी बिहारी आहेत. सध्या तमाशाला प्रेक्षक राहिलेला नाही. काही परवडत नसतानादेखील नावासाठी करायचे आहे.माझी सहावी पिढी तमाशा क्षेत्रात काम करत आहे. माझ्या मोठ्या मुलाची मुलगी सध्या पुण्यात एम.डी.डाॅक्टर आहे. नितीनचा मुलगा इंजिनिअर आहे. हे सगळं समजून घेतल्यावर मंगलताई बनसोडे यांच्या मुखातून पुन्हां तेचं वाक्य आपसूक आले…
तमाशापेक्षा कोणताही कलाकार मोठा नाही,
तमाशापेक्षा कोणही मोठा नाही,
मोठा आहे तो फक्त तमाशाचं!