साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी

भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे आटपाडी तालुकाध्यक्ष अण्णासाहेब रणदिवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली मागणी

दिघंची/प्रतिनिधी:
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी,अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे आटपाडी तालुका अध्यक्ष अण्णासाहेब रणदिवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्रातील साहित्यिकांमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.आपल्या साहित्यातून मागासवर्गीय,वंचित, श्रमिक, कष्टकरी,शेतकरी, कामकरी, कामगार, स्त्रिया यांच्या जीवनाचे वास्तववादी लिखाण करून मराठी साहित्याची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.
अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जगातील 27 भाषेत भाषांतरीत झाले आहे.भारतीय स्वातंत्र्यलढा,मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढा यामध्ये त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे.

असे उत्तुंग कार्य करणाऱ्या साहित्यिक, कवी, लेखक यांची जन्मशताब्दी १ ऑगस्ट २०२० रोजी पूर्ण होत असल्यामुळे या महाराष्ट्राच्या महान सुपुत्रास ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे,याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे आटपाडी तालुका अध्यक्ष अण्णासाहेब रणदिवे यांनी दिले आहे.