आटपाडी दि. 22 (प्रतिनिधी):
आटपाडी येथील कीर्तिवंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शंकरराव खरात यांचे जन्मशताब्दी वर्षांमध्ये स्मारक व्हावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे आटपाडी तालुकाध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे केली आहे.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शंकरराव खरात हे मूळ रहिवासी आहेत. 11 जुलै 1921 रोजी त्यांचा आटपाडी येथे जन्म झाला. डॉ. शंकरराव खरात हे जागतिक कीर्तीचे विचारवंत, नामवंत साहित्यिक, कथा-कादंबरी समीक्षक, तराळ अंतराळाचे महान लेखक, मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू,अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष,अनेक शासकीय समितींचे अध्यक्षस्थान भूषवले आहे .सन 1958 ते 1961 मध्ये प्रबुद्ध भारताचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ते सक्रिय होते.पुणे विद्यापीठाने त्यांना सन्मानपूर्वक डी .लिट ही पदवी बहाल केली आहे.
तमाम महाराष्ट्राला नव्या वांङग्मय कृतीची ओळख करून देणारे एक मराठी इतिहासातील सुवर्णपान म्हणजे साहित्यसन्मान डॉ. शंकरराव खरात. उपेक्षित, दुर्लक्षित, शोषित जगतातील माणूस त्यांच्या साहित्याचा गाभा होता.साहित्याच्या विचाराशी इमाने-इतबारे एकनिष्ठ राहून निस्वार्थ अव्यहातपणे साहित्यिक सेवाभावी लेखणीला लोकमानस देऊन डॉ. शंकरराव खरात यांनी आपले आयुष्य खर्ची केले आहे.
त्यांच्या या सागराएवढ्या अथांग कार्याची दखल घेऊन साहित्यसम्राट डॉ.शंकरराव खरात यांचे भव्य व दिव्य माणदेशाला प्रेरणा देणारे व जाणीवा जागृत करणारे स्मारक त्यांच्या मूळ आटपाडी या गावी व्हावे,अशी मागणी तालुकाध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतरावजी पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हाधिकारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे केली आहे.


संबंधित बातम्या
मराठी साहित्य मंडळाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रमोद तरळ यांना जाहीर
माडगुळे येथे उद्या शिदोरी साहित्य संमेलन
चिंचणी यात्रेनिमित्त आटपाडी आगारातर्फे जादा बसगाड्यांचे बुकिंग सुरु