प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
विटा
पदवीधर संघटनेने प्राथमिक शिक्षकांच्या उच्च शैक्षणिक अर्हतेला न्याय व प्रतिष्ठा मिळवून दिली. वेतन आणि केंद्रप्रमुखांच्या रूपाने प्रशासनामध्ये प्रवेश करून मानाचे स्थान आणि अधिकार प्राप्त केले, असे गौरवपूर्ण उद्गार संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक तथा राज्य नेते गजानन पाटील यांनी काढले.
विजयमाला पतंगराव कदम प्राथमिक विद्यामंदिर विटा येथे संपन्न झालेल्या खानापूर तालुका पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्या त्रैवार्षिक मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम सावंत होते. पाटील पुढे म्हणाले की, 5 सप्टेंबर 1970 ला स्थापन झालेल्या या पदवीधर संघटनेने प्रथमतः 1980 यावर्षी माध्यमिक शाळेच्या धर्तीवर प्राथमिक शाळेतही इयत्ता पाच ते सात वर्गावर 25% याप्रमाणे प्रशिक्षित पदवीधरांची पदे मंजूर करून घेतली.आणि राज्यातील सुमारे 20000 उच्चशिक्षित प्राथमिक शिक्षकांना वेतनश्रेणी प्राप्त झाली. पात्र पदवीधर प्राथमिक शिक्षक म्हणून ते कार्यरत झाले. अन्य संघटनांच्या तुलनेत पदवीधर संघटनेने मिळविलेले हे यश म्हणजे इतरांना मोठी चपराक होती.
14 नोव्हेंबर 1994 यावर्षी राज्यात सुमारे 4860 केंद्रप्रमुखांच्या नेमणुका झाल्या. आणि पुन्हा एक वेळ सेवाजेष्ठ प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पात्र पदवीधर पदावर नेमणुका मिळाल्या.आणि त्याबरोबर वेतनश्रेणी ही मिळाली. हे पदवीधर संघटनेचे काम अद्वितीय होते.
सन 2014 मध्ये सुमारे 16000 विषय शिक्षकांच्या नेमणुका राज्यात झाल्या इयत्ता सहा ते आठ वर्गावर काम करण्यासाठी या नेमणुका झाल्या मात्र आज अखेर या पदवीधर विषय शिक्षकांना त्या पदाची वेतनश्रेणी मिळाली नाही. केवळ एक संघटन नसलेच्या अभावामुळे हे घडल्याची खंत पाटील यांनी बोलून दाखवली. केंद्रप्रमुखाच्या नेमणुका नाहीत. त्यामुळे प्राथमिक शाळांमध्ये सुपरव्हिजन, पर्यवेक्षण आणि सनियंत्रणाचा बोजवारा उडाला आहे.
पदवीधर विशेष शिक्षकांची वेतनश्रेणी मिळविणे हा संघटनेने प्रतिष्ठेचा विषय केला असून ही वेतनश्रेणी मिळवणारच असा चंग बांधला आहे.त्यामुळे काळाची पावले ओळखून पदवीधर विशेष शिक्षकांनी पदवीधर संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र यावे. त्याशिवाय पर्याय नाही असे भावनात्मक आव्हान केले.
महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा पुरस्कृत सांगली जिल्हा विकास प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेने गरुड झेप घेतली असून शंभर कोटीचे आर्थिक उलाढालीचे लक्ष लवकरच पूर्ण करीत आहोत. संस्थेने एक अंकी व्याजदर आणि दोन अंकी डिव्हीडंट देण्याचे लक्ष पूर्ण करून सभासदांना न्याय दिला आहे, संस्था कारभारासाठी सभासदांनी आणखी सूचना कराव्यात त्या पूर्ण करण्यासाठी मी आणि माझे संचालक मंडळ कटिबद्ध आहोत असे मौलिक विचार आपल्या भाषणात चेअरमन लक्ष्मण गायकवाड यांनी मांडले.
कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे सर्व तालुके आणि जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना करण्याचे काम चालू असून संघटनेला शिक्षकांमधून मोठी साथ मिळत आहे. विषय शिक्षक आणि केंद्रप्रमुखांनी संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र आल्यास त्यांचे विविध प्रश्न सोडविणे सोपे होईल शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जिल्हा आणि राज्य शाखेचा चांगला समन्वय असून विषय शिक्षकांच्या वेतनश्रेणीबाबत राज्यस्तरावरून प्रयत्न चालू असल्याचे जिल्हा अध्यक्ष तुकाराम सावंत यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
सदरच्या मेळाव्यात शिक्षक बँकेचे संचालक संतोष जगताप आणि आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार प्राप्त झालेले गुणवंत शिक्षक धनाजी साळुंखे यांचा फेटा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींनी सत्कारास उत्तर देताना संघटना आणि पतसंस्थेबद्दल गौरव उद्गार काढले .आणि संघटना आणि पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देऊन शुभेच्छा दिल्या.
ज्ञानदेव भोसले, राजगोंडा पाटील, माणिक खंडागळे, दशरथ माळी, उमराव रास्ते, माणिक सकटे, शिवाजीराव माळी, सुभाष शिंदे, अण्णाराव पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
शेवटी जिल्हाध्यक्ष तुकाराम सावंत यांनी खानापूर तालुक्याची पुढील तीन वर्षाकरिता संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर केली. त्यामध्ये माणिक सकटे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब माने कार्याध्यक्ष आणि शिवाजी माळी सरचिटणीस म्हणून तसेच सुभाष शिंदे यांची जिल्हा प्रतिनिधी म्हणून आणि श्री भाट यांची संघटनेच्या प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाली उर्वरित सर्व पदाधिकाऱ्यांचे अध्यक्षांचे हस्ते सत्कार करण्यात आले. संघटनेचे काम आम्ही पूर्ण क्षमतेने करून झालेली निवड सार्थ करू असे सत्कारास उत्तर देताना सत्कारमूर्तींनी सांगितले.
कार्यक्रमात पतसंस्थेचे संचालक आणि संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिक सकटे आणि त्यांचा मुलगा आकाश सकटे यांचा वकिलीची सनद मिळाल्याबद्दल या पिता पुत्राचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा दुर्मिळ योग असल्याचे जिल्हाध्यक्ष तुकाराम सावंत म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी माळी यांनी केले आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन