कोरोना रुग्णाच्या संपर्काची खरी माहिती समोर येणे आवश्यक :प्रांताधिकारी शमा पवार

ग्रामपंचायतींना सुविधा पुरवण्यासाठी निधी मिळणे अत्यावशक -सरपंचाची मागणी

माळशिरस तालुका प्रतिनिधी/ संजय हुलगे :

कोरोना रुग्णाच्या संपर्काची खरी माहिती मिळणे आवश्यक असून कोरोना बाधित रुग्ण वेळेत समोर येणे आवश्यक आहे. ही जबाबदारी ग्रामस्तरीय समितीची असून समितीने आपल्या अधिकाराचा वापर करावा अशा सूचना उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी शमा पवार यांनी माळशिरस पंचायत समिती सभागृहात कोविड १९ संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना केल्या.
यावेळी तहसीलदार अभिजित पाटील ,उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील ,गटविकास अधिकारी स्मिता पाटील ,तालुका वैद्यकीय अधिकारी रामचंद्र मोहिते ,निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख ,महसूल नायब तहसीलदार डी.एन .काळे ,माजी उपसभापती किशोर सूळ ,यांच्यासह तालुक्यातील  विविध गावचे सरपंच ,ग्रामसेवक ,उपस्थित होते .
  प्रांताधिकारी पवार पुढे म्हणाल्या,आता ग्रामस्तरीय समितीने सतर्क राहणे आवश्यक आहे.बाहेरून आलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवले पाहिजे , कोरोना लक्षणे असलेल्या व्यक्तीला बाहेर काढून त्याची तपासणी केली पाहिजे.त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेतला पाहिजे .जवळचा संपर्क असलेले व दूरचा संपर्क असलेले अशी विभागणी करून त्यांचे विलगीकरण करावे .कोरोना बाधित रुग्ण असल्याचे समजताच तो रहात असलेला व संपर्क असलेला परिसर तात्काळ सील करावा .त्याचबरोबर आरोग्य विभागालाही कळवावे .गावातील नागरिक तपासणीसाठी कोठे जातात, त्या ठिकाणच्या डॉक्टर संपर्क ठेवून त्यांच्याकडून लक्षणे असलेल्या व्यक्तीची माहिती घ्यावी.आता कोरोणाचा प्रादुर्भाव गाव पातळीवर दिसू लागला आहे.यासाठी गावस्तरावर बैठका घ्याव्यात,गावस्तरीय समितीने आपले अधिकाराचा उपयोग करावा.