गावची वाट… लावायची… की दावायची?

भाई शिवराम मासाळ, संस्थापक-बळीराजा फाउंडेशन यांचा अनुभवसंपन्न लेख

आपल्या ग्रामीण भागात सर्वात मोठी समस्या कोणती असंल? तर ती आहे, शेतात जाणाऱ्या वाटंची! वाटंसाठी बांधभाऊ, भाऊबंदकित वाद हे पाचवीला पुजलेलं दिसतात! यातून जन्मान् जन्माचं वैर, हाडवैर उद्भवत जातं. एकाच आईची दोन लेकरं, एका ताटात जेवणारं भाऊबंद, शेजापाजारी ३६ च्या आकड्यासारखं वागत्यात. पिढ्यानपिढ्याचा हा वैराचा वसा उत्पन्न करत्यातं अन् असला समृद्ध (?) वारसा आपल्या पुढच्या पिढीला ईर्षेनं बहाल करत्यातं.या कळकोट्या अन् मन इटवणाऱ्या समस्येच्या मूळाशी जाण्याचा आम्हीं बळीराजा फौंडेशनच्या माध्यमांतनं जन वकालत करून शेतकऱ्यांमध्यी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यात उतरून प्रत्येकाचं मत अजमावलं, तेव्हा असं लक्षात आलं की, त्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं विचार हे वाटंबाबत सकारात्मक असत्यात, पण गावातलीच काय कळकुटी,आकुड बुद्धीचं, इटलेल्या विचाराचं,आगीचं बंब सारखं दिवं-वात पेटवून याचा इस्कुट करत्यातं. परिणामतः समेटाची बैठक झाल्यानंतर एक-दोन दिवसात पुन्हा अशा चांगल्या निर्णयाला आडफाटा घालून काहीतरी फाटं फोडलं जात्यातं. सुतासारखा मऊ निर्णय दिलेला गडी कडवा होवून वागतु. कधी-कधी तर वाटंच्या कामाला सुरुवात करणार… तेवढ्यात शेतकरी रस्ता करायं लागलेल्या मशीनच्या आडवं झोपतु. यासारखं अनेक इटकं प्रकार समोर येत्यातं.कुठं-कुठं सरबांधाच्या हक्कावरून वाद घातलं जात्यातं.
बळीराजा फाउंडेशनच्या माध्यमातून वाटंची वाट काढण्यासाठी आम्ही हे समजून घेण्याचं ठरवलं. संस्थेच्या कार्यकर्त्यांची व स्थानिक पातळीवरील दोन-तीन सद्गृहस्थांची नेमणूक करून गुप्त माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अनेक विखारी विषय पुढं येतात.
त्यातील मुख्य विषय असं असतात- गावातलं गावपुढारी हे दोन्हीं बाजूच्या शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबात झालेले वाद आठवण करून देतात.अगदी त्याचा आजोबा तुझ्या आजोबासोबत बैलाच्या बाजारात भांडला हुता, तव्हां तुझ्या आजोबाच्या कानशिलातच त्याच्या आजोबानं लगावली हुती, तू ही विसरतुया अन् त्येला रस्ता देतुयां म्हटल्यावर मला फार आनंद झालाय बघं. तुझ्यासारख्या मोठ्या मनाचा माणूस हायं, म्हणून वाट हुतीया! न्हायतर कुठली वाट? अन् कुठला रस्ता!
तीन डुयांचा राग कोण इसरतु बाबा?
मागील महिन्यातलंच उदाहरण घ्यायचं,तर तुझी म्हस त्याच्या रानात गिली, तवा तो गडीमाणूस आसूनपण त्यानं तुझ्या बायकुला ऐकू वाटत न्हाय अशा लाखोटाक्याच्या शिव्या व्हायल्या.इतका अपमान सहन करूनपण त्याला तू रस्ता देतुयास! तुझ्यासारखा भला माणूस कोण हाय सांग की ह्या गावात?
असं वादविवाद विकोपाला घेऊन जायंची कामं कोण करतंया, तर ती गावगाड्यातलं ढाबा संस्कृतीचं पुढारी(?)! त्यांच्या ह्या रस्त्यांवरनं येय -जायचा काडीचापण संबंध न्हाय! अशी लोकं आपली राजकीय पुळी भाजून घेयसाठी करत्याती.वाटंच्या प्रश्नाशी ह्यांचा काडीचापण संबंध नसतु, पण प्रश्न निकाली निघला तर आपली किंमत काय राह्यली, ह्यचंच त्यन्हास्नी भ्या लागल्यालं असतंय! गाव पुढाऱ्याच्या काखंतल्या बगलबच्च्यांनी तर काड्या टाकून ही वाद भडकवलं! गावा-गावातलं, माणसा-माणसातलं वैर जीतं ठेवलं,आता त्यी रोज-रोज धुपंत्यातं! त्याच्यावरच ह्यांची गाडीखालच्या कुत्र्यासारखी चंगळ चालल्या! पोकाळ हावंन ह्येंची छाती पाक फुटायचा वकुत आलाया, पण जातीला भान न्हाय! असं पण आढाळलं की जागु-जाग!
ह्याचा परिणाम गावागावातली भांडणं पुलीस ठाण्यात,मामलेदार कचीरीत जात्याती. पुन्हां ह्या गावटग्यांचे दुकान चालू हुतं. पण ही काय बरं हाय व्हय!
असं प्रश्न मुळांपस्न संपवायचं असत्यालं तर युवकांनी आपल्या गावात पुढाकार घिऊन अशा इद्रूप मानसिकतेच्या लोकांपस्न दूर राहून आपल्या घराकडं,शेताकडं जाणाऱ्या वाटंचं वाद मिटवून, वाट करून घितली पाहिजे. ह्यासाठी सरकारपण पाणंद रस्त्यांच्या योजनेत पुढाकार घेतयंच की,!पण गरज हाय फकस्त एकत्र येण्याची! चला तर मग गावची वाट लावणाऱ्या कळकोट्यांची एकसंघपणे वाट लावूया,अन् हातात हात घालून गावाला वाट दावूया!
– भाई शिवराम मासाळ, संस्थापक, बळीराजा फाउंडेशन