सादिक खाटीक आटपाडी जि.सांगली
प्रदेश महासचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र
आटपाडी ग्रामपंचायतीच्या जागी नगरपंचायत होवून ४ महिने होत आले. आणखी काही महिन्यांनी नगरपंचायतीची नवीन वॉर्ड रचना होवून निवडणूकही लागणार आहे . वास्तविक नगरपालिका झाली असती तर नगरपंचायती पेक्षाही मोठा विकास निधी आला असता, नगरपालिकेची अधिकार कक्षा आणि शहराच्या परिघाची कार्यकक्षाही वाढली असती . पूर्वी आटपाडी ग्रामपंचायतीचाच भाग असणारी, आटपाडीच्या सरहद्दीवरील मुढेवाडी, पुजारवाडी, देशमुखवाडी, यप्पावाडी, खांजोडवाडी, मासाळवाडी ही गावेही पुन्हा आटपाडीचा भाग बनली असती . तथापि आटपाडीच्या हिताचे, प्रगतीचे कोणाला पडले आहे . नगरपंचायतच करायची होती तर अनेक वर्षे हा निर्णय प्रलंबीत का ठेवला ? आटपाडीच्या हिताचे धोरण राबवणाऱ्यांचा चांगुलपणा हाच म्हणायचा का ?
आटपाडी हे शहर आता सर्वच दृष्टीने मोठे केंद्र बनू लागले आहे . आटपाडी तालुक्याच्या ६० गावा बरोबर शेजारच्या सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, माण, खटाव, माळशिरस, खानापूर, जत, कवठेमहंकाळ तालुक्यांतील शेकडो लोकांचा शेती ,व्यापार, उद्योग, विविध कारणाने आटपाडीस प्रतिदिनी ये – जा करण्याचा मोठा राबता आहे . तीन जिल्ह्याच्या सरहद्दीवरील तालुक्याचे महत्वाचे शहर म्हणून आटपाडी, भारतभर ओळखले जाते . विविध प्रकारचा मुबलक भाजीपाला, विविध धान्ये, कडधान्ये, डाळींब, द्राक्ष या सह विविध प्रकारची फळे, शेती आणि शेतीपुरक व्यवसायातील सर्व प्रकारची औजारे, बी – बीयाणे, खते, औषधे जीवनाला लागणारे सर्व पदार्थ, वस्तू, घटक यांची मोठी – महत्वाची बाजारपेठ म्हणून आटपाडी शहर नावारूपाला आल्याचे अनेक वर्षाचे चित्र आहे. शेळ्या – मेंढ्या – बोकडे – बकरे – पाटी – लाव्हर यांच्या शनिवारच्या आटपाडीच्या या बाजाराने आंध्रप्रदेश, कर्नाटक, गोवा, पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा, कोकण, पुणे , मुंबई पर्यतच्या व्यापारी, दलाल, हेडे, पशुपालक, शेतकरी बांधवांना मोठी भुरळ पाडल्याचे देशवासीय जाणतात . हा बाजार म्हणजे हजारो शेतकरी , कष्टकऱ्यांची तातडीचा पैसा मिळवून देणारी आर्थिक वाहिणी बनला आहे . हे आटपाडीचे हितशत्रूही मान्य करतील . कारखानदारी, उद्योगधंदे , बँका, विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये, शेकडो प्रकारचे व्यावसायीक यांनी खचाखच भरलेल्या आटपाडीने आपली वाटचाल विटा – इस्लामपूर शहरासारखी व्यापक स्वरूपात चालवली आहे . शैक्षणीक विश्वासाठी आटपाडीत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही हजाराच्या पटीत आहे . शासन व्यवस्थेतील शेकडो अधिकारी कर्मचारी, सेवक यांचे वस्तीचे ठिकाण आटपाडी असल्याचे अनेक वर्षाचे चित्र आहे . दुध, दुभत्यांच्या उद्योग व्यवसायाबरोबर ,अंडी मांस, मासळी , चिकन वगैरे खवय्यांच्या आणि मद्य पिणाऱ्यांच्या व्यवसायाने मोठी झेप घेतल्याचे मोठ्या संख्येतल्या हॉटेल – बार, मटन, चिकन, मासळी वगैरेच्या दुकान धंद्यावरून दिसून येते . एकूणच काय ? चौफेर, सर्वांगीण प्रगती करणारे मोठे शहर म्हणून आटपाडी शहराची वेगाने घोडदौड सुरू आहे . दळण वळणाचे राज्य, जिल्हा, ग्रामीण मार्ग ही उत्तम बनल्याने आटपाडी शहरातुन सर्व दिशांना जाणार्या व सर्व दिशांनी शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांचा आकडा ही शेकडोंच्या घरात जावू शकतो . हे वास्तव आहे .
शहर म्हणून नावारूपाला येत असलेल्या आटपाडीच्या अंतर्गत विकासाबाबत प्रत्येकाने सुजाण नागरीक म्हणून विचार करणे महत्वाचे ठरणार आहे . आटपाडी एस.टी . स्टॅन्डपासून श्री. कल्लेश्वर मंदिर, गावचावडी, श्री .रामनाथ मंदिर मार्गे मुख्य पेठेतून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था काय आहे . याचा विचार करणे महत्वाचे आहे. अत्यंत तोकड्या रुंदीचा, स्वतः च्या जागेबाहेर पायऱ्या ओटे काढून अनेक दुकानदारांनी रस्त्याचा केलेला दुरुपयोग, खरेदी साठी आलेल्या दुचाकीस्वारांची दुकानां भोवतीची गर्दी, एखादे चार चाकी वाहन या अर्धा किमी अंतराच्या मुख्य रस्त्यावरून एक दोन तासात दुसऱ्या टोकाला जाईल की नाही याची शाश्वती देता न येण्यासारखी स्थिती, व्यावसायीकांचे रस्त्याला अडथळे ठरतील असेच व्यावसायीक प्रसिध्दीचे बोर्ड, दररोज याच रस्त्यावरून ये जा होणारी शेकडो विद्यार्थी, नागरीक, ग्राहक, विक्रेते, वाहनधारक नागरीक यांची प्रचंड गर्दी, आटपाडी शहराला विकृत, बकाल आणि अस्थाव्यस्ततेचे रूप देते . पावसाळ्यात या रस्त्यावर होणारा चिखल, रस्त्यावरील जागोजागच्या खड्यात साचणारे पाणी, कमालीची दुर्गंधी आणणाऱ्या व्यापारी पेठेतल्या ओबड – धोबड गटारी, नळांच्या फुटलेल्या अथवा नव्या कनेक्शन साठी खोदला जाणारा रस्ता, हे विदारक चित्र आटपाडीच्या मुख्य रस्त्याचे बनले आहे . कोणाचे वाईट व्हायचे ? आम्हांला सत्तेचे राजकारण करायचे आहे . या वृत्तीच्या आजवरच्या अनेक राज्यकर्त्याच्या भूमिकेने या पेठेची लक्तरे निघाली आहेत . प्रशासन नावची यंत्रणा यासाठी काही कसे करू शकली नाही, हे लाजीरवाणे आहे . आटपाडी ओढ्या पात्राच्या अलीकडील मुळ आटपाडी शहराच्या अंतर्गत बोळातल्या रस्त्यावरून चारचाकी सोडा, दुचाकी जाणे ही अवघड अशी स्थिती वर्षानुवर्षांची आहे . बोळा सोळातले दर्शनी नागरीक, ना मागे सरायला तयार आहेत, ना प्रशासन यावर मार्ग काढायला तयार आहे . पेव्हींग ब्लॉक, क्राँकीट अथवा डांबरी करणाने हे बोळकांडी रस्ते जुजबी शेकरले असले तरी नळांच्या दुरुस्त्या, बांधकामांचा कचरा, गटारांची पडझड, तुंबणाऱ्या गटाराचे रस्त्यावरून वाहणारे पाणी, हे अनेक ठिकाणच्या चित्रांनी आपण अति मागास खेड्यात तर नाही ना ? असाच भास होतो . मुख्य गावातल्या अनेक विजेच्या डांबांवर बंद दिव्यांची आणि पिण्याच्या पाण्यासाठी होणारी तारांबळ नेहमीचे दृश्य असते, पाण्याबाबत थोडेसे बदललेले चित्र सुखद असले तरी प्रतिदिनी सकाळ – संध्याकाळ पाणी, ही सर्वसामान्यांची गरज सत्यात येणे हे खऱ्या प्रगतीचे लक्षण ठरू शकते . गावातून केर कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्यांची सुरु झालेली यंत्रणा सर्व ठिकाणी जावू शकत नसल्याने यावर व्यापकतेने, बारकाईने उपाय योजना अपेक्षित आहे . गावात बांधकाम ठिकाणाहून निघणारा दगड, माती, वीट, सिंमेट वगैरेंचा मोठा कचरा ओढ्यातच ओतला जात असल्याने ओढ्यानांही बकाल केले जावू लागले आहे . अतिक्रमण, वाळू उपशातून निर्माण केलेले खड्डे, वाढीव जागा ढापता यावी म्हणून ओढ्यात दुतर्फा सुरु असलेली पुढे जागा वाढविणेची स्पर्धा, व्यवसाय, धंद्यासाठी उध्वस्त केली जात असलेली मोठ मोठाली झाडे, कोठे ही मेलेल्या बेवारस जनावरांचे शव उघड्यावर टाकण्याचे ठिकाण, ही ओढा पात्रे बनविण्याचा सर्वांनीच चालविलेला आटापिटा , आटपाडीच्या सुंदर कुरूपतेला आणखी अस्ताव्यस्त दुर्गंधीयुक्त चकाकदार उकीरड्याचे रूप देण्यात सर्वांनाच असुरी आनंद होत आहे . गल्ली – बोळे – ओढ्या – नाल्यातून राडीराड होवून फिरणारी डुकरे, कुत्री आटपाडीच्या शोभेत आणखी भरच घालत आहे . बाजार दिवशी बाजारात विक्रेता म्हणून बसणाऱ्या जवळील उर्वरीत शिल्लकीचा नाशवंत केरकचरा सर्वत्र जवळच टाकण्याच्या सर्वांच्या सवयीने ओढा पात्रे उत्तम प्रकारचे उकीरडे बनविण्याकडे सर्वांची वाटचाल सुरु आहे. उघड्यावर शी शु करणाऱ्या १८ वर्षावरील बालकांची संख्या कमी झालेली नाही . हे ढोबळ चित्र मुळच्या आटपाडीचे आहे.
बाहय आणि विस्तारलेल्या आटपाडीचे चित्र फारसे चांगले आहे असे नाही . गुंठेवारी खरेदीतून कसल्याही शासकीय आराखड्या विना बांधलेली घरे, सांडपाणी, केरकचरा यांच्या विल्हेवाटीचे उभे राहीलेले संकट, विविध प्रकारचे रस्त्यावर साचणारे पाणी, होणारा चिखल ,खड्डे, दुर्गंधी, वगैरे दुरावस्था यांच्याही पाचवीला पुजलेल्या . दिवाबत्ती, पाण्याची यथातथाच अवस्था . एकूणच विकासाचा आकार उकार रूपरेषा नसलेल्या आटपाडीला एक आदर्श शहर बनवायचे आहे . याच ध्येयाने प्रत्येक आटपाडीकर नागरीक बंधु भगिनींनी आपल्या पासून बदलाची सुरुवात करायला हवी . प्रत्येकाने दोन पावले मागे सरण्याच्या भावनेने या विकासाच्या यज्ञ कुंडात वाहून घेतले पाहीजे . मी, माझे घर, माझी गल्ली, माझ्या गल्लीतली गटारे, रस्ते, कचऱ्याची व्यवस्था इत्यादींवर लक्ष दिलेच पाहीजे . तथापि शहरातील प्रत्येक उणीवेवर उपाय निघण्यासाठी शहराचे रक्षक बनणे महत्वाचे आहे. गल्ली बोळातले रस्ते ३० फुटाचे , शहराचा मुख्य रस्ता, ओढ्यातून जाणारा आणि आटपाडीच्या पुर्वेकडून ओढ्यातून स्टॅन्ड कडे येणारा बायबास रस्त्यांचे शंभर फुटी रस्त्यात रूपांतर करणे हेच आटपाडीच्या प्रगतीचे, पाऊल सर्वांनी टाकणे गरजेचे आहे. शहर म्हंटले की विरुंगळ्याची ठिकाणे हवीतच, बाग – बगिचा, मुलांना ,माता, भगिनी, वृद्धांना थोडा वेळ व्यतित करण्यासाठी शांततेची आकर्षक ठिकाणे निर्माण करणे आटपाडीसाठी अलंकार ठरणार आहे . घरोघरी शौचालय असणे बंधनकारक केले गेले पाहीजेच तथापि बाहेरून येणाऱ्या बंधु, भगिनी, विद्यार्थी – विद्यार्थीनी या हजारोंसाठी प्रत्येक शे – दोनशे मीटर वर सुलभ शौचालये, मुताऱ्या अत्यावश्यक आहे . सार्वजनिक उपक्रम, धार्मीक कार्यक्रम, लग्न समारंभ वगैरेसाठी शहराच्या चारही दिशांना ५०० आसन क्षमतेचे बहुउद्देशीय सभागृहांची निर्मिती नगरपंचायतीस नवे रूप देवू शकते . खेळाडू, विद्यार्थ्यासाठी अभ्यासिका, व्यायामशाळा, प्रशस्त मैदानांसाठी नवीन जागा खरेदी करणे आणि त्यावर या सुविधा साकारणे आटपाडी नगरपंचायतीचे पुढील उद्दीष्ट असले पाहीजे . विविध शासकीय जागा, देवस्थान इनाम वर्ग, इतर इनाम वर्गावरील बेकायदेशीर अतिक्रमणे काढून त्या जागी गरजू, गरीब आणि रस्त्याकडेच्या व्यावसायीकासाठी जागा उपलब्ध करून देणे संपन्न, समृद्ध आटपाडीस पोषक ठरणार आहे. मांस, मच्छी, अंडी, चिकन, सुखी मासळी वगैरें साठी शहराच्या चार ही दिशांना बारामतीच्या धर्तीवर मटन – मच्छी मार्केट साकारणे शहराच्या शोभा, आरोग्य आणि स्वच्छतेत भर घालणारे ठरणार आहे . आटपाडीच्या फरशी पुलाच्या जागी मोठ्या उंचीचा समानतेने गाव जोडणारा २०० फुटी नवा पुल शहराला जोडणारी मुख्य वाहीनी ठरणार आहे . शहरात विविध ठिकाणी, मर्यादित मजल्यांचे अत्याधुनिक पार्किंग स्टेशन , किमान २०० लोक छताखाली उभी राहतील अशी चार ही दिशांना बंदिस्त स्मशानभूमीची उभारणी आटपाडी शहराच्या विकास मालेत भर टाकणारे ठरणार आहे . गावच्या मध्यवर्ती ठिकाणच्या सरकार वाडा, खादी भांडार सारखी विस्तृत जागेची ठिकाणे अशा अनेक ठिकाणच्या मोठ्या जागा भाडेतत्वाने ताब्यात घेऊन शहराला नवा आयाम देतील अशा व्यवस्था साकारल्या गेल्या पाहीजेत . किमान ९० मीटर रुंदी गृहीत धरून आटपाडीच्या तलाव आणि सांडीपासून येणारे आटपाडीचे दोन्ही ओढे विस्तीर्ण पटांगणासारखे कॉक्रीटीकरण युक्त केल्यास या ओढ्याच्या दुतर्फा प्रचंड मोठे रस्ते सोडून मोठी बाजार पेठ साकारली जावू शकते . त्यादृष्टीने सकारात्मक विचार झाला पाहीजे . निम्म्याने असलेल्या महिला शक्तीसाठी प्रगतीची दालने खुली करणारी व्यवस्था यंत्रणा साकारली गेली पाहीजे . लिज्जत पापड सारखे विविध प्रकारचे ग्रामोद्योग कुटीरोद्योग, कोंबड्या शेळी पालन वगैरे व्यवसाय उद्योगांची शृंखला महिला सबलीकरणास उपयुक्त ठरेल . त्यांच्या व्यवसायातून उत्पादीत मालाला व्यापार बाजारपेठ उपलब्ध करणारे प्रशस्त महिला बचत भवन आटपाडीला मोठी गती देणारे ठरेल . नगरपंचायतीच्या देखरेखी खालील नाट्यगृह, स्मारक, विश्रामगृह आटपाडीला शहराचे मोठे रूप प्राप्त करून देणार आहे . सांगली जिल्ह्याच्या निर्मितीच्या पंचाहत्तरीत जिल्ह्यातले प्रत्येक गाव, शहर, तालुका, सर्वच क्षेत्रात देशात अव्वल आले पाहीजे, हा माजी मंत्री, आमदार जयंतराव पाटील साहेबांचा ध्यास सत्यात येण्यासाठी आटपाडी शहर आणि तालुकावाशीयांनी अंगणी आलेल्या कृष्णामाईच्या जीवनदायी ताकदीचा अर्थात पाण्याच्या शक्तीचा उपयोग करून घेतला पाहीजे .
झुक झुक आगीनगाडीचे आटपाडीकरांचे स्वप्न तर शतकापासूनचे आहे . कराड – विटा – आटपाडी मार्गे पंढरपूर आणि बारामती – माळशिरस – आटपाडी – जत मार्गे विजयपूर ( विजापूर ) या रेल्वे मार्गानी आटपाडी, देशाशी जोडली जावू शकते . गलाई व्यावसायिक, कापड गिरणी कामगार, गोदी कामगार , नोकरी व्यवसायासाठी देशभर वास्तव्यास असलेल्या आटपाडी आणि तालुका वाशियांना आटपाडी शहर नेहमीच अंतरीचे वाटले आहे . शहराच्या आणि अंतर्गत वाड्या वस्त्यांच्या प्रत्येक रस्त्यावर, शाळा, कॉलेज वगैरे सर्वच मोक्याची जागी सीसीटीव्ही शहर आणि नागरीकांना मोठी सुरक्षा देवू शकणार आहे. माणदेशाच्या मध्यवर्ती आणि मुख्यालय असलेल्या आटपाडीत जिल्हा रुग्णालय आरोग्य सेवेचा दर्जा तत्परता वाढीस लावणार आहे . शहरालगतचा साखर कारखाना, सुतगिरणी वगैरे उद्योग सक्षमतेने चालले पाहीजेत . विकासाच्या परिवर्तनाचे ते एक प्रमुख शस्त्र आहे . शेकडो उदयोगांना सामावणारी ८ – १० हजार एकरातील मुंबई – बेंगलुरू औद्योगिक कॉरीडॉर केंद्र अर्थात एमआयडीसी आटपाडी शहराची, परिसराची, तालुक्याची मोठी औद्योगिक क्रांती तर ठरेलच तथापि हजारो हातांना रोजगार, अब्जावधी रुपयांची उलाढाल आटपाडीला सर्वात प्रगत श्रीमंत शहर बनवणार आहे . शेजारच्या सात आठ गावच्या सिमामध्ये आटपाडी शहराची वाढ विस्तारणार आहे . हे स्वप्न ही सत्यात येणे प्रत्येक आटपाडीकरांचे उद्दीष्ट असले पाहीजे .
आटपाडी शहराचा सर्वांगीण व चौफेर विकास झाला पाहीजे, भ्रष्टाचार विरहीत पारदर्शक कारभार होण्यासाठी आटपाडी शहर वाशीयांनी आपल्या प्रभागातल्या चांगल्या अभ्यासु, कर्तव्य तत्पर व्यक्तीला उमेदवारी करण्यासाठी प्रवृत्त केले पाहीजे . अमर्याद पैसा खर्च न करता या निवडणूकीत शासकीय निवडणूक खर्चातच नागरीकांनी पुढे केलेला उमेदवार निवडून दिला पाहीजे . राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते आनंदरावबापु पाटील यांनी या भूमिकेचा चालविलेला जागर प्रशंसनीय आहे . तर नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीच्या महिला नेत्या सौ . अनिता पाटील यांनी सुरु केलेल्या प्रभागातल्या वाडी वस्ती परिसर भेटीच्या माध्यमातून सुरू केलेले अभियान सर्वांना जागे करणारे आहे .
आटपाडी तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी, वस्तीचा सर्वांगीण आणि वेगवान विकास साधण्यासाठी अग्रभागी राहणारे आटपाडी शहर सर्वच बाजूनी प्रगत, विकसीत झाले पाहीजे . हे सर्व घडवून आणण्याची फार मोठी ताकद, मृगाच्या बेंबीतल्या कस्तुरीप्रमाणे प्रत्येक नागरीकाच्या डोळस मतदानात दडलेली आहे . या ताकदीचा योग्य माणसे निवडण्यासाठी उपयोग केल्यास आणि शहराच्या बांधणीत संघटनात्मक ताकद एकवटल्यास, कोणत्याही नेत्याला, विकासापासून आटपाडी शहराला वंचित ठेवता येणार नाही . स्मार्ट सिटीच्या सुध्दा मर्यादापार या सर्व गोष्टीं प्रत्यक्षात येण्यासाठी गरज आहे ती पक्षीय विचार बाजूला ठेऊन विकासाच्या मुद्यावर एकत्र येण्याची. आभासी विचाराला व्यवहाराची जोड दिल्यास हे शक्य आहे . ज्यांना विकासाचा दृष्टिकोन आहे अशा काही नेत्याना एकत्र आणून नानासाहेब परळेकरांनी पुण्यात असा प्रयोग फार पूर्वी केला होता. सर्व पक्षातल्या, सर्व संस्था, संघटनातल्या, सुजाण नागरीकांनी सुसंवादाने वाटचाल केल्यास हे शक्य आहे . त्यासाठीच आटपाडीकरांनो, आटपाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी बोलते, लिहते, कर्ते, जागृत नागरीक व्हा.

संबंधित बातम्या
विजयादशमी दसऱ्याची प्राचीन महती, पर्यावरण रक्षण
आरेवाडीत धुमाकूळ माझ्या साहेबांमुळंच!
गावची वाट… लावायची… की दावायची?