
ग्रामीण भागात सर्वात मोठी समस्या कोणती असेल तर ती आहे शेतात जाणाऱ्या वाटेची! वाटेसाठी शेतबंधू,भावभावकीत नेहमीच वाद होताना दिसतात.याच्या मूळाशी जाण्याचा आम्ही बळीराजा फौंडेशनच्या माध्यमांतून जन वकालत करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला, तेव्हां प्रत्येक शेतकऱ्यांचे विचार हे वाटेबाबत सकारात्मक असतात, पण मिटिंग झाल्यानंतर दुसऱ्या – तिसऱ्या दिवशी विरोध केला जातो. कधी कधी तर रस्त्याच्या कामाला सुरूवात करणार तेवढ्यात शेतकरी मशीनच्या आडवे झोपताना दिसतात, असे अनेक प्रसंग समोर येतात,कुठे कुठे सरबांधाच्या हक्कावरून वाद घातले जातात.
आम्ही हे समजून घेण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांची व स्थानिक पातळीवरील दोन तीन ग्रामस्थांची नेमणूक करून गुप्त माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अनेक विषय समोर येतात.
त्यातील मुख्य विषय असे असतात, गावातील गाव पुढारी हे दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना, त्यांच्या कुटुंबात झालेले वाद आठवण करून देतात.अगदी त्याचा आजोबा तुझ्या आजोबासोबत बैलांच्या बाजारात भांडला होता, तेव्हा तुझ्या आजोबांच्या कानशिलात लगावली होती. तू हे विसरून त्याला रस्ता देतोय, म्हटल्यावर मला फार आनंद झाला. तुझ्यासारख्या मोठ्या मनाचा माणूस आहे म्हणून वाट होतेय. नाहीतर कुठली वाट अन् कुठला रस्ता!
तिन पिढ्यांचा राग कोण विसरतो बाबा?
मागील महिन्यातीलचं उदाहरण घ्यायचे,तर तुझी म्हैस त्याच्या शेतात गेली तेंव्हा तो गडीमाणूस असूनदेखील त्याने तुझ्या बायकोला ऐकू वाटत नाहीत अशा लाखोटाक्याच्या शिव्या दिल्या,इतका अपमान सहन करूनदेखील त्याला तू रस्ता देतोयस, तुझ्यासारखा भला माणूस कोण हाय सांग की ह्या गावात?
असे वादविवाद विकोपाला घेऊन जायचे काम कोण करतात तर ते आहेत गावगाड्यातील ढाबा संस्कृतीचे पुढारी! त्यांच्या ह्या रस्त्यांवरून ये -जा करण्याचा कोणताही संबध नाही, असे लोक स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी करत असतात, वाटेच्या प्रश्नाशी ह्यांचा कोणताही संबध नसतो. पण प्रश्न निकाली निघाला तर आपली किंमत कमी होईल, याची खोटी भिती असते. ह्याचा परिणाम गावागावातील भांडणे पोलीस स्टेशनमध्ये जातात, पुन्हां ह्या गावटग्यांचे दुकान चालू होते. असे प्रश्न मुळांपासून संपवायचे असतील तर युवकांनी आपल्या गावात पुढाकार घेऊन अशा मानसिकतेच्या लोकांच्यापासून दूर राहून आपल्या घराकडे,शेताकडे जाणाऱ्या रस्त्यांचे वाद मिटवून रस्ते करून घेतले पाहिजेत. ह्यासाठी सरकार पाणंद रस्त्यांच्या योजनेत पुढाकार घेत आहे,गरज आहे फक्त एकत्र येण्याची!

संबंधित बातम्या
विजयादशमी दसऱ्याची प्राचीन महती, पर्यावरण रक्षण
आरेवाडीत धुमाकूळ माझ्या साहेबांमुळंच!
आटपाडीकरांनो,सर्वांगिण विकासासाठी बोलते,लिहते,कर्ते व्हा!