
आरेवाडीत अवतरली होळकरशाही

आरेवाडीत अवतरली होळकरशाही म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण उत्तरेत एका लढाईत पराक्रम गाजवून सुभेदार कदमबांडे यांचेकडे शूरवीर मल्हारराव होळकर गेले असता, सुभेदार कदमबांडे यांनी शूरवीर मल्हारराव होळकर यांचेवर खुश होऊन विचारले, “तुम्हांला बक्षीस काय हवे?”
तेव्हा मल्हारबा म्हणाले, “तुम्ही पाठीवर हात ठेवलात हेच आम्हाला बक्षीस आहे, पण ह्या उपरही काही मेहरबान देणार असाल तर ज्या निशानाखाली आम्ही अनेकदा तलवारी गाजवल्या, ते निशान आपण आम्हांस वापरण्याची परवानगी द्यावी!”
सरदार कदमबांडे यांनी शूरवीर मल्हारराव होळकर यांना शेलापागोटे देऊन यथोचित सन्मान करून कदमबांडे यांचे लाल- पांढरे बांडे निशान वापरण्याची परवानगी १७२५ साली दिली.
तेव्हा पासून लाल- पांढरे निशाण होळकरी बांडेनिशान ओळखले जाऊ लागले,शूरवीर मल्हारराव होळकर यांनी अटकेपार जो झेंडा फडकवला होता, तो झेंडा पिवळा किंवा भगवा नव्हता,तो झेंडा!
आरेवाडी बनात श्री.श्री.श्री. विरोबा उर्फ बिरोबा उर्फ भैरोबा उर्फ विरभद्र उर्फ गिरोबा उर्फ भैरवानाथ,तमाम बहूजन समाजाचे तथा नागवंशीय समाजाच्या कुलदैवता साक्षीने लाल-पांढरा झेंडा लावून शेकडो वर्षे झाकलेला इतिहास जिवंत करण्याचे काम लोकनेते मा.आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.लाखोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदयास हा झेंडा कोणता आहे, अनेकांना लोकांना वाटले होते,पडळकर आज नवीन संघटनेची घोषणा करतील, परंतू मैदानावर जाताना होळकरी बांड निशान दिसले.
तसे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांला प्रचंड आनंद झाला,अगदी छाती गर्वाने भरून आली, धनगरांच्या इतिहासाची जागृती करणारे नेतृत्व जन्माला आले आहे,आता कोणाची बिशाद नाही, समाजाला खुळे समजण्याची.
कधी काळी धनगरांच्या क्रांतीचा इतिहास ह्या देशाने पाहिला असताना, ही जमात एका कोपऱ्यात कशी काय गेली? हा प्रश्न सातत्याने पडत होता.
भारतीय स्वातंत्र्यासाठी आद्यक्रांतीकारक ठरलेल्या बेळगाव जिल्ह्यातील कित्तूरसंस्थांनाच्या धनगर कन्या राणी चेन्नमा यांचा जन्म काकती गावी २३ ऑक्टोबर १७७८ रोजी झाला,त्यांनी ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध युद्ध केले. ते युद्ध १८२४ ते १८२९ पर्यंत चालले. परंतू त्यांच्याच राज्यांतील सरदार संगप्पा व हुराकडली यांनी फितूरी करून शहरातील चोरवाटा माहिती करून दिल्यामुळे ब्रिटीशांनी राणी चेन्नमा यांना अटक करून जेलमध्ये टाकले व राणी मृत्यू २ फेब्रुवारी १८२९ जेलमध्येचं झाला.
तद्नंतर कित्तूर संस्थानाचे सेनापती धनगरपुत्र संगोळी रायान्ना यांचा जन्म १५ ऑगस्ट १७९८ रोजी बेळगाव जिल्ह्यातील संगोळी ह्या लहानशा गावात झला. त्यांनी ब्रिटिशांच्या विरूध्द आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढा दिला. सात फूट उंचीच्या संगोळी रायान्नास नंदगड येथे वडाच्या झाडाला दि.२६ जानेवारी १८३१ रोजी फाशी देताना प्रश्न विचारला.
“सांग रायान्ना तुझी शेवटची इच्छा काय?”
तेव्हां हसत हसत फासावर जाणारे रायान्नांने ब्रिटिशांना उत्तर दिले “मी पुन्हा जन्म घेऊन ब्रिटिशांना भारतभूमीतून हाकलून देईन”, इंग्रजांच्या विरुद्ध लढताना फासावर जाणारे पहिले क्रांतीकारक संगोळी रायान्ना ठरले आहेत. ह्याची इतिहासाने नोंद घेतली. इतका मोठा ज्वलंत इतिहास धनगर जमातीला असताना लाचारी कशासाठी ? हा विचार येत असताना दि.२ ऑक्टोबर रोजी आरेवाडीत क्रांतीकारक नेता म्हणून ज्यांची इतिहास नोंद घेईल, असे वंचित,शोषित घटकांचे नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामुळे नवी आशा, नवी दिशा मिळणार हे शाश्वत वाटले.
दसरा मेळावा आयोजित करण्यामागचा हेतू अगदी स्पष्ट दिसून आला. धनगर जमातीचा अतिशय जिव्हाळ्याचा असलेला आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न पुन्हा पटलावर येऊ पाहतोय.
मेंढपाळांना राखीव कुरणे विकसित करणे ह्यावरती विचारमंथन होताना दिसले, मेंढपाळांना मारहाण होत असताना पोलीस खाते स्थानिक राजकीय लोंकाच्यामुळे बघ्याची भुमिका घेत आहेत, त्यासाठी मेंढपाळ सुरक्षा कायदा बनवन्यासाठी प्रयत्न होईल, असा आशावाद वाटू लागलाय. असे एक ना अनेक प्रश्नांचा ऊहापोह करण्याचा शुद्ध हेतू दिसला, हे कोणीही नाकारू शकत नाही. धनगर जमातीस मंजूर झालेल्या २२ योजना आता कागदावर राहणार नाहीत, याचा विश्वास वाटला. कारण आजचा जनसैलाब इतका मोठा होता की कोणत्याही सरकारच्या ऊरात धडकी भरली असती.
सरकार भा.ज.प.चे आहे, पडळकरांनी सध्या सरकारच्या कानात जाऊन सांगता येईल इतकी ताकद आणि उंची पडळकरांनी निश्चित निर्माण केली आहे, हे अगदी पडळकरद्वेषी आहेत, त्यांनाही मान्य करावे लागेल.
पडळकरांनी आरेवाडीच्या गजनृत्याचा (कैपतीनृत्य)चा इतिहास मांडताना १९५२ साली स्वतंत्रदिनाच्या वेळी भारताचे पहिले प्रधानमंत्री स्व.पंडीत जवाहरलाल नेहरूजी यांनी आरेवाडीच्या गजृत्याचे कौतूक केले असल्याचा दाखला देत, सध्या भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील सन २०२० साली महाराष्ट्राचा सांस्कृतिक रथ म्हणून आरेवाडीचे गजनृत्य व मेंढपाळ असे प्रतिक देशासह जगाला दाखवले.
आमदार गोपीचंद पडळकर हे सध्या धनगर जमातीच्या लोकांना आपण कोण होतो, ह्याचा विसर पडल्याने आजची परिस्थिती निर्माण झाली आहे,कधीकाळी आपण ह्या भारतभूमीचे सम्राट होतो, सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक,राजा बिंबिसार, सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक महाराणी अहिल्यामाई होळकर, चक्रवर्तीराजा यशवंतराव होळकर,राजे तुकोजीराव होळकर ,राणी भिमाबाई होळकर,राष्ट्रसंत कनकदास,पेरीयार रामास्वामी नायकर व राजे सम्राट, क्रांतीकारक अशा महान जमातीतून आलो आहोत हे सांगायचे काम करत आहेत, झोपलेल्या जमातीला जागे करण्याचे महानकार्य हे महायोद्याने हाती घेतले आहे, यांस अंशतः यश प्राप्त झाले आहे. त्यांस बळकटी देण्याचे काम आपले आहे,ह्या कार्यास मनःपुर्वक अभिनंदन व शुभेच्छा..

भाई शिवराम मासाळ
संस्थापक/अध्यक्ष बळीराजा फौंडेशन.
९९२२१७३२८४

संबंधित बातम्या
विजयादशमी दसऱ्याची प्राचीन महती, पर्यावरण रक्षण
आटपाडीकरांनो,सर्वांगिण विकासासाठी बोलते,लिहते,कर्ते व्हा!
गावची वाट… लावायची… की दावायची?