
राष्ट्रकुल रौप्यपदक विजेता संकेत सरगर आणि पंचकुला सुवर्णपदक विजेती काजोल सरगर
आमदार जयंतराव पाटील यांचेकडून अभिनंदन !
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी/सांगली:
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री,आमदार श्री.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील कासेगांव शिक्षण संस्थेच्या आर्टस आणि कॉमर्स महाविद्यालय आष्टाचा विद्यार्थी संकेत महादेव सरगर यांने राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टींग मध्ये रौप्यपदक मिळवून भारताचे नाव उंचावले आहे.
संकेत सरगरच्या या अभूतपूर्व यशाबद्दल आमदार जयंतराव पाटील यांनी इंग्लंडमध्ये असलेल्या संकेतशी मोबाईलवर संपर्क करीत त्याचे खास अभिनंदन करून कौतुक केले आहे.
इंग्लंड येथील बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेट लिप्टींग मध्ये ५५ किलो वजनी गटात संकेतने २४८ किलोग्रॅम वजन ( ११३ व १३५ ) उचलुन रौप्य पदक पटकावले. संकेतचे रौप्यपदक भारताला मिळालेले पहिले पदक होते. ऐनवेळी उद्भवलेल्या दुखापतीमुळे संकेत केवळ १ किलोने सुवर्ण पदकापासून दूर राहिला.
सांगलीच्या संजयनगर परिसरात पानपट्टीचा व्यवसाय करीत उपजिविका करणाऱ्या संकेतच्या वडिलांची आर्थिक स्थिती जेमतेमच आहे. प्रचंड मेहनत, प्रबळ इच्छाशक्ती, सांगली जिल्हा वेट लिप्टींग संघटनेचे मार्गदर्शन, आष्टा कॉलेज व कासेगांव शिक्षण संस्थेचे सहकार्य या जोरावर संकेत हा जागतिक स्तरावर चमकला आहे.
संकेत सरगर यांचा परिवार मूळचा आटपाडी तालुक्यातील तळेवाडीचा आहे. संकेतच्या उत्तुंग यशाचे माणदेश, सांगली जिल्हा, महाराष्ट्रासह देश – विदेशात मोठे कौतुक होत आहे.
सांगली जिल्हा वेटलिफ्टींग संघटनेचा खेळाडू असलेल्या संकेतने १३ व्या वर्षापासून वेट लिप्टिंगचे धडे घेण्यास सुरुवात केली. २०१७ नंतर संकेत आणि तिची सख्खी बहीण सुवर्णपदक विजेती कु. काजोलने शिवछत्रपती पुरस्कार विजेते सांगलीचे मयूर सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे मार्गक्रमण केले आहे. कासेगांव शिक्षण संस्थेने आणि आष्टा महाविद्यालयाने संकेतला मोठे सहकार्य केले आहे. कासेगांव शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी मित्रांनी संकेतचे अभिनंदन करून मोठा जल्लोश केला आहे.
काही महिन्यापूर्वी हरीयाणा पंचकुला येथे संपन्न झालेल्या १७ वर्षाखालील खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत संकेत सरगरच्या सख्या लहान भगिनीने अर्थात कु. काजोल महादेव सरगरने सुवर्णपदक पटकावून त्या स्पर्धेतले महाराष्ट्राला पहिले पदक मिळवून दिले होते.
संकेत आणि काजोल या भावंडांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.




संबंधित बातम्या
जत येथे शिवाजी विद्यापीठ सांगली विभागीय मैदानी स्पर्धांना सुरुवात
निंबवडे प्रीमियर लीग पर्व सहाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न
राष्ट्रीय नेमबाजीत भांबुर्डीच्या रुद्राक्षला सुवर्णपदक