

पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या हस्ते उद्घाटन
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या भव्य क्रीडांगणावर शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सांगली विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली असुन या मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना रामाघरे म्हणाले की, मी महाविद्यालयात शिकत असल्यापासून वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होतो. मैदानी स्पर्धेत भाग घेतल्यामुळे उत्तम आरोग्य तर राहतेस त्याचबरोबर मनाचीही उत्तम मशागत होते. विद्यार्थीदशेत असताना एक राष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू असण्याचे फायदे मला माझ्या पोलीस सेवेमध्ये होत आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश पाटील म्हणाले, राजे रामराव महाविद्यालयाला खेळाची व खेळाडूंची मोठी परंपरा असून अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवण्याचे काम महाविद्यालयाच्या जिमखाना विभागामार्फत होत आहे. शिवाजी विद्यापीठच्या संलग्नित महाविद्यालयामध्ये या महाविद्यालयाचा सर्वात सुंदर असा धावण्याचा ट्रॅक आहे, याचा लाभ सर्व खेळाडूंनी घ्यावा, असे आवाहनही यावेळी बोलताना त्यांनी केले.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी १००,२००, ४००, ८०० व ५००० मीटर पल्ल्याच्या शर्यती, लांब, उंच, तिहेरी उडी, गोळा, भाला, व हातोडा फेक इत्यादी क्रीडा प्रकार पार पडले. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचलन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सिद्राम चव्हाण यांनी तर जिमखाना विभागप्रमुख प्रा.अनुप मुळे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी कुलाळ, प्रा. दीपक कांबळे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व सांगली जिल्ह्यातून आलेल्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या
निंबवडे प्रीमियर लीग पर्व सहाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न
राष्ट्रीय नेमबाजीत भांबुर्डीच्या रुद्राक्षला सुवर्णपदक
माळशिरस येथील श्रीनाथ विद्यालयाचे कराटे स्पर्धेत यश