गलाई बांधवच माणदेशाच्या आर्थिक विकासाचा कणा

सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्यामुळे माणदेशाचा बहूतांशी आर्थिक विकास झाला-भाई शिवराम मासाळ
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी (जि.सांगली)

आटपाडी तालूका हा नेहमीच दुष्काळी तालूका म्हणून परिचीत असलेला.परंतु इथली माणसं मात्र दुष्काळाचे कारण देऊन कधी रडत बसली नाहीत. शेती पिकत नाही म्हणून कधी पळपूटापणा करून इथले शेतकरी आत्महत्या करत नाहीत. इथल्या प्रत्येक गावातील माणूस स्वप्न उराशी घेऊन शहरात गेला. तो फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात व श्रीलंका,नेपाळ ह्या राष्ट्रात देखील गेला. भारतातील तर असा एकही तालुका नसेल तिथं मायदेशातील माणूस नाही.दुष्काळामुळे शेती कमी पिकते म्हणून घरात बसेल तो माणदेशी माणूस कसला? अनेक गावातील तरूण सोने-चांदीच्या गलाई व्यावसायासाठी गाव सोडून गेले. गाव सोडताना पुढे कोणकोणती संकटे आहेत ह्याची तसूभरही कल्पना नाही. फक्त डोक्यात एकच असायचं, तिथं व्यावसाय करताना सर्वात मोठी अडचण कोणती असेल ती भाषेची. आमचा माणूस अल्पशिक्षित किंवा अशिक्षतच होता.त्याही संकटावर त्याने लिलया मात केली. अगदी सहा-सात महिन्यात तिथल्या भाषा अवगत केल्या. मग ती भाषा कोणतीही असो. अशा अनेक संकटांवर मात करून आपला व्यवसाय त्या-त्या शहरात प्रस्थापित करूनदेखील तो आपला गाव विसरला नाही.
प्रत्येकांनी आपल्या गावातील जमीन-जुमला सुधारला. चार-चार किलोमीटरवरून पाणी आणून शेती सुधारली. त्यामुळे माणदेशाचा विकास हा गलाई बांधवामुळेच अधिक प्रमाणात झाला आहे.शेती सुधारण्यासाठी ट्रॅक्टर,जे.सी.बी.,पाॅकलॅंड अशी वाहने तालूक्यात आली. कराडपर्यंत मजूरीसाठी जाणारा मजूर आपापल्या गावत थांबू लागला. नवनवीन घरांच्या बांधकामामुळे गंवडी,मजूर,रंगकाम करणारे रंगारी, लोहार ,सुतार, फर्निचरवाले ह्यांना काम मिळू लागले. पैसा-पाणी हातात खेळू लागल्याने लग्न,बारसे,वाढदिवस, मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने त्या संबधित व्यावसायाची चलती झाली.शेती डेव्हलप झाल्यामुळे दुग्धव्यावसायाची चलती झाली. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात दहा दिवसाला पैसे येऊ लागले.डाळींबाच्या शेतीमुळे तर सांगोला व आटपाडीचे नाव सिंगापूरसारख्या शहरास परिचीत झाले आहे.
सध्या माणदेश विविध क्षेत्रात प्रगती करत असला तरी माणदेशाच्या प्रगतीत गलाई व्यावसायिकांचे सर्वाधिक श्रेय आहे,असे माझे मत आहे. परंतु गलाई व्यावसाय करणाऱ्या बांधवांकडून अनेक अपेक्षा आहेत. तुम्हीं सर्वांनी एकत्रित येऊन माणदेशातील प्रत्येक तालूक्यात आयडाॅल असे मोठे व्यावसाय उभे करावेत. तुमच्यामुळेच आपला माणूस गावातच थांबेल. तुमची माणदेशाला अत्यंत गरज आहे.
गलाई बांधवांची एकी!
माणदेशाची प्रगती!

भाई शिवराम मासाळ
अध्यक्ष- बळीराजा फौंडेशन.
📞 ०९९२२१७३२८४