आ.राम सातपुते यांच्या प्रयत्नातून नातेपुते नगरपंचायतीस ४.५ कोटी रुपयांचा निधी
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस
माळशिरस आमदार राम सातपुते यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ४ जुलै रोजी नातेपुते ता. माळशिरस येथील नगरपंचायतीच्या विविध विकास कामांसाठी साडेचार कोटी रुपयांच्या निधीच्या मागणीचे पत्र दिले होते. या पत्राची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत व विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी तात्काळ लक्ष देऊन नातेपुते नगरपंचायतीच्या विविध विकास कामांसाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने नातेपुते नगरपंचायत व नागरिकांच्या वतीने आ. राम सातपुते यांचे विशेष आभार मानले जात आहेत.
राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नातेपुते नगरपंचायतीच्या विविध विकास कामांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेषतः लक्ष देऊन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ. राम सातपुते यांनी केलेल्या मागणीचा विचार करून तात्काळ साडेचार कोटी रुपये मंजूर केले असून यानंतर माळशिरस नगरपंचायतीच्या विविध कामांसाठीही निधी देण्याचे आ. राम सातपुते यांना आश्वस्थ केले.
नातेपुते नगरपंचायतीच्या प्रभागांमधील रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण करणे, मंदिरासमोरील उद्यानाचे सुशोभीकरण करणे, सभा मंडप बांधणे, स्मशानभूमी कंपाउंड व सुशोभीकरण करणे ,अंडरग्राउंड गटार तयार करणे, वडार समाजासाठी शौचालय बांधणे ,वडार समाज सभागृह सुशोभीकरण करणे ,कॅनॉलवरील रस्ते तयार करणे ,ज्या प्रभागांमध्ये रस्ते करणे आवश्यक आहे व ज्यांची मागणी झाली आहे, अशा सर्व रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या कामासाठी हे साडेचार कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती आमदार राम सातपुते यांनी दिली.
ठाकरे व पवार सरकारच्या काळात भाजपच्या आमदारांना निधीबाबत सापत्न वागणूक दिली जात होती. परंतु राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिंदे व फडणवीस सरकारच्या कार्यकाळात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी केलेल्या मागणीचा विचार करून माझ्या मतदारसंघातील विकास कामांसाठी सढळ हाताने शिंदे व फडणवीस सरकार मदत करीत असून ही मदत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम लोकप्रतिनिधी म्हणून मी करीत आहे.
आ.राम सातपुते,सदस्य माळशिरस विधानसभा मतदारसंघ

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन