ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत -सागर शिनगारे

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, ओबीसी आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असताना निवडणूक घेण्याचा अट्टाहास करू नये, तसेच पावसाळ्यात निवडणुका घेणे उचित ठरणार नाही. राज्य सरकारने निवडणुक आयोगाला तशी विनंती करावी व सर्वोच्च न्यायालयातील लढा तीव्र करावा, यासह अनेक मागण्यांचे निवेदन ओबीसी व्हिजेएनटी बहुजन परिषदेचे जत तालुका अध्यक्ष सागर शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली प्रांताधिकारी जोगेंद्र कटारे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगर परिषद व ४ नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे. म्हणून आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत यावर ओबीसी व्हीजे एन टी बहुजन परिषद ठाम आहे.
ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ओबीसी व्हीजे एन टी बहुजन परिषद सर्वोतोपरीने प्रयत्न करत आहे. आमचे नेते विजय वडेट्टीवार पहिल्या दिवसापासून स्वतः यात जातीने लक्ष घालत आहेत. महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांटिया आयोगाने इम्पिरेकल डेटा गोळा करून अहवालही तयार केला आहे.
या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल व ओबीसी समाजाला आरक्षण मिळेल याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
यावेळी ओबीसी व्हीजे एन टी बहुजन परिषदचे राष्ट्रीय समन्वयक संजय विभुते, जिल्हा उपाध्यक्ष दिनकर पतंगे, जत तालुकाध्यक्ष, सागर शिनगारे,नागनाथ मोठे, उपाध्यक्ष सचिन मदने, सोमनाथ पाटील आदीजन उपस्थित होते.