स्वाभिमानी स्वबळावर लढवणार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक- महेश खराडे

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
सांगली

सांगली जिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका स्वाभिमानी स्वबळावर लढवणार आहे, अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. या निवडणुका ‘एक व्होट, एक नोट’ या तत्त्वानुसार लढविण्यात येणार आहे.
निवडणुकीची दिशा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत लवकरच व्यापक मेळावा घेवून ठरविण्यात येणार आहे.रस्त्यावरच्या लढाईबरोबरच सभागृहातही शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी जिल्हा परिषद, विधानसभा आणि संसदेत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असले पाहिजेत. म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक ताकदीने लढविण्यात येणार आहेत.
यावेळी खराडे म्हणाले, गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून शेतकरी व सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नावर संघटना रस्त्यावर उतरून काम करत आहे. ऊस, दूध, वीज, कडकनाथ, पाणी योजना ,रेशन, आदी प्रश्नावर मोर्चे आंदोलन करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या ऊस बिलासाठी गेली एक वर्षभर आंदोलन सुरू आहे.या आंदोलनाच्या माध्यमातून दहा हजार शेतकऱ्यांना ५० कोटी रुपये ऊस बिल मिळवून दिले आहे. विसापूर पुणदी योजना मार्गी लागावी यासाठी पाणी परिषदा घेवून ती योजना मार्गी लावण्यास तत्कालीन सत्ताधाऱ्यांना भाग पाडले. त्यामुळेच मांजर्डे, हातनुर, आरवडेसह तासगाव तालुक्यातील ३२ गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला. त्यामुळेच या परिसरात ऊस शेती बहरली आहे. ज्या परिसरात तुळशीच्या लग्नालाही ऊस मिळत नव्हता, तेथे आता ऊसाचे जादा पीक शेतकरी घेवू लागले आहेत. त्यामुळे या परिसराचा कायापालट झाला आहे.
कडकनाथ कोंबडी घोटाळ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यात्रेत कोबड्या फेकल्या होत्या. त्यावेळी कार्यकर्त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता.
वीज दरवाढ रद्द करावी, वीज बिलात सवलत मिळावी, यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात राज्यभर आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्ह्यातही वीज कार्यालय पेटविणे, रास्ता रोको, मोर्चे आदी आंदोलने करण्यात आली. त्यामुळेच वीज बिलात ५० टक्के सवलत देण्याची योजना सरकारला जाहीर करावी लागली. तसेच वीज बिल वसुली मोहीम स्थगित करावी लागेल,हे आंदोलनाचे यश आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधीची कर्जे राईट ऑफ करण्याचे धोरण घेतले जाणार होते. त्याला संघटनेने तीव्र विरोध करून आंदोलन केले. त्यामुळे तो निर्णय मागे घेतला. तसेच आमच्या रेट्यामुळे शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजना सुरू करण्यास भाग पाडले. यामुळे हजारो थकीत शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. रेशनिंग प्रश्नावर आवाज उठवून तेथील काळाबाजार थांबविण्याचा प्रयत्न केला.
दूध प्रश्नावरही सातत्याने आवाज उठवून दूध दरात राज्य शासनाला भाग पाडले आहे. दूध दर वाढीच्या आंदोलनात राज्यात पहिला टँकर सांगली जिल्ह्यात फोडण्यात आला होता. त्याप्रकरणी माझ्यासहित सहा कार्यकर्त्यांना अटक झाली होती. आम्ही तुरुंगवास भोगला, मात्र दूध उत्पादकांना न्याय मिळवून दिला.
एकदरीतच संघटना शेतकऱ्याच्या जगण्या-मरण्याशी निगडित असणाऱ्या सर्वच प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करते.
आम्ही केवळ आंदोलन, मोर्चे काढत नाही, तर रचनात्मक कामही करतो. शिवार कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवीन तंत्र शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करतो. शिवार फार्मर्स कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. यातून शेतकरी ते ग्राहक चळवळ सक्षम करावयाची आहे.
आमचे कार्यकर्ते लढाऊ आहेत. मात्र आर्थिकदृष्ट्या फाटके आहेत. त्यामुळेच मतदारांनी मतही द्यावे आणि पैसेही द्यावेत,ही आमची भूमिका आहे.
या निवडणुकीची रणनिती होणाऱ्या मेळाव्यात स्पष्ट केली जाईल. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. या मेळाव्याला माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह प्रा.जालिंदर पाटील, सावकार मदन नाईक,रविकांत तुपकर, पोपट मोरे, संजय बेले, संदीप राजोबा, भागवत जाधव, दामाजी दूबल, अशोक खाडे, बाबा सांदरे,राजेंद्र माने, संजय खोलखुंबी, भरत चौगुले, तानाजी धनवडे, जगन्नाथ भोसले, राम पाटील, रमेश माळी, शमसूद्दिन संदे,आदीसह अन्य उपस्थित राहणार आहेत