प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
‘टीका करण्यापेक्षा केलेल्या कामाच्या जोरावर सभासदांच्या समोर जाणार आहोत,भविष्यकाळात सभासदांनी विश्वास ठेवल्यास सर्व कर्जाचे व्याजदर एक अंकी करणार’असे मत सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन यु.टी. जाधव यांनी आटपाडी येथे पत्रकार परिषदेत मांडले.
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून आटपाडी तालुक्यासह जिल्ह्यातून ठिकठिकाणाहून शिक्षक समितीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यानिमित्त पत्रकार परिषदेचे आयोजन करून शिक्षक समितीच्यावतीने बँक निवडणुकीमध्ये आपली भूमिका त्यांनी मांडली.
यावेळी शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष संजय कबीर, सांगली जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक व उमेदवार हैबतराव पावणे, दिपक कुंभार, फुले,शाहू,आंबेडकर रुग्णालयाचे संचालक श्रीकांत कुंभार, प्रसिद्धीप्रमुख भास्कर डिगोळे, प्रवीण बाड, उमेदवार शामराव ऐवळे, सरचिटणीस नानासाहेब झुरे आदि उपस्थित होते.
चेअरमन यु.टी.जाधव बोलताना पुढे म्हणाले,सभासदांनी शिक्षक समितीच्या कारभारावर विश्वास ठेवला.टप्प्याटप्प्याने व्याजाचा दर खाली आणून एक अंकी व्याज दर केला.भविष्यकाळात विश्वास ठेवल्यास सर्व कर्जाचे व्याजदर एक अंकी करणार आहोत.जामिनकी नंबर २चे सोळा लाखवरील कर्जाचे व्याजदर एक अंकी करणार आहोत.टप्प्याटप्प्याने व्याजदर कमी केले, तर डिव्हीडंट मात्र वाढवण्यात यशस्वी झालो.या पंचवार्षिक कालावधीमध्ये चांगले काम केल्याने शिक्षक समितीकडे उमेदवारांची लाईन लागली आहे.
डीसीपीएस धारकांना पाच लाख रुपये,तर दुर्दैवाने एखाद्या सभासदाचा मृत्यू झाल्यास त्याची १०० टक्के कर्जमाफी करण्याचा विचार आहे.
विरोधकांनी दोन वर्षाच्या कालावधीत फोडाफोडी करून सत्ता मिळवली.आता विरोधकांच्याकडे अनेक संघटना एकत्र आल्या आहेत,पण नेते त्यांच्यामागे आहेत आणि सामान्य सभासद समितीसोबत आहेत.विरोधकांच्या दीड वर्षाच्या सत्ताकाळात व्याजदर १०.७५ वरून १३.७५ केला. त्यामुळे त्यांना कर्जाच्या व्याजदरावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.दीड वर्षात ठेवी वाढवून उलाढाल दाखवून विरोधकांनी दीड वर्षात २७ कर्मचारी भरले.
सन २०१० ते २०१९ या कालावधीत शासनाची नोकर भरती नाही.परंतु,सेवानिवृत्ती मात्र झाली.त्यामुळे सभासद घटले. म्हणून इतर जिल्ह्यात कार्यक्षेत्र वाढवून सभासद केले आणि बँकेचा विस्तार वाढवला. सोलापूर जिल्ह्यातील सध्या १३०० सभासद आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सभासदांची गैरसोय टाळण्यासाठी सभासदांच्या मागणीनुसार मध्यवर्ती ठिकाणी शाखा उघडण्याचा विचार आहे.टीका करण्यापेक्षा केलेल्या कामाच्या जोरावर निवडणुकीत सभासदांच्या समोर जाणार आहोत.
शिक्षक भारतीचे अध्यक्ष महेश शरणाथे, खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अरविंद गावडे व या दोन्ही संघटनांचे पदाधिकारी, सभासद-सदस्य शिक्षक समिती सोबत आहेत. पुरोगामी सेवा मंडळांमध्ये सर्व नवख्या उमेदवारांना संधी देणे हे वैशिष्ट्य आहे.
विश्वनाथ मिरजकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच किरण गायकवाड, सयाजीराव पाटील, किसनराव पाटील, माणिक पाटील,शशिकांत भागवत,हरिबा गावडे,अरविंद गावडे, महेश शरणाथे,बाबासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीचा हा प्रपंच सुरू असून ३ जुलै रोजी मतदान होणार आहे.मतदारांनी निःसंकोचपणे मतदानरुपाने पुन्हा विश्वास दाखवून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन