
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
विकासाच्या गतीच्या व लोकसंख्येच्या विस्ताराच्या दृष्टीने आटपाडी नगरपंचायतीऐवजी नगरपरिषद किंवा नगरपालिका व्हावी अशी मागणी आटपाडी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील यांनी आटपाडी येथे पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, आटपाडी येथे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आटपाडी नगरपंचायतीची घोषणा केली. परंतु, ग्रामपंचायत व नगरपंचायतमध्ये विशेष फरक नसतो. फक्त घरपट्टी व पाणीपट्टी वाढते.त्या प्रमाणात विकास कामासाठी आर्थिक निधी मिळत नाही. नगर पंचायतीपेक्षा नगर परिषदेला विकास कामासाठी शासनाकडून जादा आर्थिक निधी मिळतो. तसेच नगरपरिषदेपेक्षा नगरपालिकेला शासनाकडून जादा आर्थिक निधी मिळत असतो. त्यामुळे गावाच्या विकास कामाला चालना मिळते.गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नगर पंचायतऐवजी नगरपालिका केल्यास आटपाडीचा वेगाने विकास होईल.
नगर विकास विभागाने १ मार्च २०१४ रोजी नगरपंचायतीची अधिसूचना काढली होती. त्यानंतर त्यावर सुनावण्या घेण्यात आल्या. पुढे २ मे २०१८ रोजी नगरपंचायतीची अधिसूचना काढण्यात आली. दिवसेंदिवस हा कालावधी वाढत गेल्यामुळे या कालावधीत लोकसंख्याही वाढली, आवश्यक असणाऱ्या गरजा वाढल्या, त्या पूर्ण करण्यासाठी नगरपालिका होणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरपालिका करण्याची मागणी वाढली. २०१४ सालची अधिसूचना २०१८ साली रद्द केली .त्याप्रमाणे आता हरकतींचा विचार करून नगरपालिका करावी. त्यासाठी आटपाडीच्या शेजारी भरपूर गावे आहेत, त्या आजूबाजूच्या गावांचा समावेश करून मंत्री महोदय, नेते व आमदार यांनी विचार करून नगरपंचायत रद्द करून सुधारित आदेश काढावा. त्यासाठी मूळ आटपाडीमध्ये असणारी गावे घेण्यासही हरकत नाही. ज्या पद्धतीने तासगाव, मिरज या शहरांचा रूपांतरणामुळे विकास झाला, त्याप्रमाणे आटपाडी नगरपालिका झाल्यास विकास होईल. नगरपरिषदेची अधिसूचना रद्द होईल, त्याचदिवशी नगरपालिकेची अधिसूचना काढावी, अशीही मागणी केली.
गावाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर नगरपालिका किंवा नगर पंचायत करावी, याचा विचार नगर विकास मंत्री महोदय, आमदार यांनी करावा.
आटपाडी ग्रामपंचायतीची स्थापना १९५३ साली झाली. आटपाडी गावांमध्ये ४० वाड्या-वस्त्या आहेत. त्या वाड्यावस्त्यांचा विचार केला तर नगरपालिकेशिवाय पर्याय नाही. मूळ जुन्या आटपाडीत देशमुखवाडी, पुजारवाडी(आ), यपावाडी, खानजोडवाडी, मुढेवाडी, भिंगेवाडी, मापटेमळा, आदि गावांचा समावेश होता. त्या गावांचा ठराव घेऊन निकषाला अनुसरून नगरपालिका करावी.
आटपाडी नगरपंचायत केल्यास विकास कामाची पंचायत होईल. २०११ च्या जनगणनेनुसार आटपाडीची लोकसंख्या २० हजार ७०० इतकी होती. आता ती सुमारे ३० ते ३५ हजारच्या आसपास झाली आहे. विकासाच्या गतीचा आढावा घेऊन नगरपालिका केल्यास, ज्याप्रमाणे इचलकरंजीसारख्या इतर महानगरपालिकांनी येथे येऊन महानगरपालिका केल्याबद्दल मंत्रिमहोदय यांचा सत्कार केला, तसा आम्ही नगरपालिका केल्याबद्दल त्यांचा तेथे जाऊन सत्कार करू.
यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे सल्लागार अँड. धनंजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मेटकरी, सुखदेव कदम, विपुलशेठ कदम आदि उपस्थित होते.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन