आटपाडी नगरपंचायत मंजूर

नगर विकास मंत्री एकनाथराव शिंदे यांची मोठी घोषणा
आटपाडीत शिवसेना नेते तानाजीराव पाटील यांचावाढदिवस व शेतकरी मेळावा संपन्न
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांनी आटपाडी नगरपंचायत मंजूरीची घोषणा आटपाडी येथे केली. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व शिवसेना नेते तानाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही मोठी घोषणा करून आटपाडी नगरपंचायत क्षेत्र मॉडेल कसे होईल, यासाठी निधी कमी पडू देणार नाही,असा विश्वास व्यक्त केला.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तानाजीराव पाटील यांना अध्यक्ष म्हणून पदवी तुम्ही लोकांनी दिली आहे.अनिलभाऊंच्या रूपाने असा कर्तबगार आमदार भेटला आहे,हे तुमचे सौभाग्य आहे. यांच्यासारखी दुसऱ्यांसाठी जगणारी माणसे कमी असतात.कोविडच्या काळात चांगले काम केले.माझे ऑफिस गाडीमध्ये चालते-बोलते आहे, त्यामुळे लोकांची सोय होते, जीव वाचतात. लोकप्रियता विकत मिळत नाही, कामाच्या जोरावर कमवावी लागते. अनिलभाऊंचे नाव लोकांच्या हृदयात कोरलेले आहे, ते कोणालाही पुसता येणार नाही . शेतकऱ्यांच्या पिकांच्या रोगराईवर कृषी मंत्री दादा भुसे यांना सांगून बैठक लावून उपायोजना करण्यासाठी ते स्वतःचे संपर्क साधतील. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करणारे कृषिमत्री आहेत.शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना लागेल त्या मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“आटपाडी नगरपंचायत मंजूर करतो” हे जाहीर करताच टाळ्यांच्या गजराने त्यांच्या घोषणेचे स्वागत करण्यात आले.आटपाडी नगरपंचायत मॉडेल क्षेत्र कसं होईल, यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही ते म्हणाले.
गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई म्हणाले, तानाजीराव पाटील व अनिल भाऊ विचारांनी एकत्र आले आहेत,अशा कार्यकर्त्यांना ताकद मिळाली पाहिजे. कार्यकर्ता अडचणीत असताना उभा राहिले पाहिजे, अशी भाऊची भावना होती. अनिलभाऊंनी पाण्यासाठीचा ८१:१९ प्रश्न मार्गी लावला. अनिलभाऊंनी लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे, ते कोणी पुसू शकणार नाही.
आमदार अनिलभाऊ बाबर म्हणाले, मी १९९० पासून सात निवडणुका लढलो,तानाजीराव खंबीर कार्यकर्ता बरोबर उभा असल्यामुळे मला पराजयची भीती वाटली नाही. सर्व प्रश्नांची तड लावणारा, खडानखडा माहिती असलेला व माझं निम्मं काम करणारा कार्यकर्ता कार्यकर्ता आहे.
आटपाडी तालुक्यात कष्टाळू माणसे आहेत. डाळिंब पिकावरील पिनहोल शासनाच्या कृषी खात्यासमवेत बैठक घ्यावी असे सांगून फळबागांमध्ये हा मतदारसंघ राज्यांमध्ये कॅलिफोर्निया होईल असा विश्वास व्यक्त केला. टेंभू योजनेबाबत बोलताना ते म्हणाले,सर्वांच्या प्रयत्नामुळे टेंभूचे पाणी आले आहे.डाळींबाचा प्रश्न सोडवा,सन्मानाची वागणूक मिळावी व जनतेला सन्मान मिळावा,आटपाडी शहर सांगली जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाचे करण्यासाठी प्रयत्न करावेत,मला मंत्री नको, महामंडळ नको पण मतदार संघ मॉडेल होईल असे काम करायचे आहे, त्यासाठी बळ द्यावे. आटपाडी नगरपंचायत निर्माण होणेसाठी प्रयत्न केले. नगर पंचायत करावी अशी आजची घोषणा करावी अशी विनंती करून विकासाचा फार मोठा निधी द्यावा लागेल अशी त्यांनी मंत्री शिंदे यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केली.
शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, अभ्यासाने परिपूर्ण नेतृत्व अनिलभाऊ तुमचं आहे, त्याला कोण छेद देणार नाही.रक्त सांडणाऱ्या माणसाचा हा भाग आहे, पण दुर्दैवाने खायला अन्न नाही.मंत्री शिंदेसाहेब यांनी अवर्षणग्रस्त भागाचे स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ तयार करावे.
खासदार धैर्यशील माने बोलताना म्हणाले,अनिलभाऊ खानापूर-आटपाडीचं नाक आहे, ते कोणी बदलू शकत नाही.
शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, कामाचा प्रचंड डोंगर उभा केला.टेंभूचे पाणी अनिलभाऊ बाबर यांच्यामुळेच आहे.
सत्कारमूर्ती तानाजीराव पाटील म्हणाले, गुरु आणि शिष्य प्रेम कसे असावे हे दाखवण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम होत आहे.अनिलभाऊ आणि माझी जोडी फोडण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, पण ते असफल ठरले.निष्ठेला गालबोट लागू दिले नाही.वरिष्ठ नेतेमंडळीकडून काही मिळाले नाही,माझा नेता मंत्रिमंडळात दिसला नाही ही खंत आहे,ती येत्या कालावधीत भरून निघावी.सगळे पक्ष विरोधात गेले, मात्र कार्यकर्ते खंबीर आहेत.अनिलभाऊच टेंभूचा बाप आहे.तालुका शिवसेनामय केल्याशिवाय राहणार नाही.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब होनराव यांनी आभार मानले.
यावेळी मंत्री शिंदे यांचा तुळशीहार घालून व बैलगाडी भेट देऊन सत्कार करण्यात आला.संजय विभुते,आनंदराव पवार व व शिवसेनेचे पदाधिकारी नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.