माडग्याळजवळील अपघातग्रस्ताची दैना!
माडग्याळ ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर!
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत
जत तालुक्याच्या पूर्व भागात सुसज्ज असे माडग्याळ ग्रामीण रुग्णालय आहे. माडग्याळचे हे रुग्णालय नावालाच असल्याचे उघड झाले असून या रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अपघातात जखमी झालेल्या ३५ वर्षीय तरुणाला चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज हे स्वतः गाडी चालवित माडग्याळ ग्रामीण रुग्णालयात घेवून गेले .पण तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी बेशुद्ध रुग्णाला साधे गाडीतून खालीही उतरू दिले नाही की प्राथमिक उपचारही करण्याचे सौजन्य दाखवले नाही. उलट एक नंतर येथे डॉक्टर नसताात, असे सांगून अपघातग्रस्ताला वैद्यकीय मदत करण्यासाठी हात वर केले. माडग्याळ ग्रामीण रुग्णालयाचा हा अजब कारभार सुरू असताना त्याबद्दल मात्र कोणीही चकार शब्द बोलण्यास तयार नाहीत.
त्याचे घडले असे, वेळ दुपारी दोनची,जत तालुक्यातील तिल्याळ येथील ३५ वर्षीय मनगेणी नागाप्पा कटरे हे मोटारसायकलने माडग्याळहून गावी निघाले होते. माडग्याळपासून दोन किलोमीटर अंतरावर आसंगी रोडवर कटरे यांचा मोटार सायकलवरील ताबा सुटला व ते गंभीर जखमी होवून बेशुद्ध अवस्थेत एक तास रस्त्याकडेला पडून राहिले. श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सदस्य रुपेश काटे, बाळासो पोरे हे संख येथील मानव मित्र संघटनेची बैठक आटोपून माडग्याळला निघाले होते. त्यांनी तातडीने तुकाराम बाबा महाराज यांना अपघाताची माहिती दिली.
अपघाताची माहिती मिळताच तुकाराम बाबा महाराज हे स्वतः बोलेरो गाडी घेवून घटनास्थळी आले. बेशुद्ध अवस्थेत रस्त्याकडेला पडलेल्या मनगेनी कटरे यास तातडीने गाडीत घालून माडग्याळ ग्रामीण रुग्णालय गाठले. पण तेथे डॉक्टर नसल्याचे सांगत त्यांच्यावर साधे प्राथमिक उपचारही करण्यात आले नाहीत. रुग्ण कटरे यांची अवस्था बिकट असल्याने त्यांना तातडीने माडग्याळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने रक्तस्त्राव होत होता. जखमी कटरे यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचार केल्याने त्यांचा जीव वाचला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तातडीने माडग्याळ रुग्णालय गाठले व त्यांनी तुकाराम बाबा यांचे आभार मानले.
१०८ सेवेचे वाजले बारा
अपघाताची ही घटना घटना घडल्यानंतर अनेकांनी १०८ क्रमांकाला फोन करून अपघाताच्या घटनेची माहिती दिली. तास उलटून गेला, रुग्ण रुग्णालयात पोहचला तरी १०८ चा पत्ता नव्हता. उलट १०८ वाले अपघात कोठे घडला हेच तासभर विचारत होते. १०८ सेवेचे बारा वाजल्याचेही सिद्ध झाले
माडग्याळ रुग्णालयाचे करायचे काय ?
कोट्यावधी रुपये खर्चून माडग्याळ ग्रामीण रुग्णालय उभारले आहे .पण हे रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा अशी गत झाली आहे. हे रुग्णालय नावालाच आहे. या रुग्णालयात वेळेला डॉक्टरच नसल्याने तेथील अवस्था काय असेल हे लक्षात येते. माडग्याळ ग्रामीण रुग्णालयावर लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
तुकाराम बाबा आक्रमक
अपघातासारखी घटना घडते, तास उलटून गेला तरी १०८ गाडी येत नाही. खाजगी गाडीने त्यांना माडग्याळ रुग्णालयात आणले, तर डॉक्टर नसल्याचे सांगून साधे प्राथमिक उपचारही केले जात नाहीत. शासनाच्या या यंत्रणेचा फायदा काय? शासकीय यंत्रणा जीव गेल्यावर मदत करणार काय? या शब्दात तुकाराम बाबा यांनी यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त केली.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर