
अमित पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आज बुधवार दिनांक २० एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये विशेष तज्ञ डॉक्टरांमार्फत सर्व रोग तपासणी मोफत केली जाणार आहे. हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, मेंदूचे आजार, फुफुसाचे आजार, कॅन्सर, गरोदर माता व स्त्री-तपासणी, लहान मुलांचे आजार, किडनी आजार, मोतीबिंदू, त्वचारोग, गुप्तरोग, कान, नाक व घसा आजार, अस्थीरोग, एचआयव्ही तपासणी, क्षयरोग, दंतरोग, कुष्ठरोग व सर्व आजारांबाबत ही तपासणी करण्यात येणार आहे.
महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत रक्त, लघवी, एक्स-रे गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत.
आयुष विभाग अंतर्गत आयुर्वेद व होमिओपॅथी उपचार तसेच निरोगी जीवनशैलीविषयी आहार व योगा, इतर सल्ला व मार्गदर्शन केले जाणार आहे.
किशोरवयीन मुला-मुलींसाठी, कुमार अवस्थेतील बालकांच्या समस्या याविषयी सल्ला व मार्गदर्शन केले जाणार आहे.
या मेळाव्यात विशेष बाब अंतर्गत नेत्रदान, अवयवदान, देहदान संबंधित स्वयम् इच्छापत्र भरून घेतले जाणार आहेत. तसेच डिजिटल हेल्थ आयडी (युनिक हेल्थ आयडी) व आयुष्यमान भारत कार्ड यासाठी पासपोर्ट साईज दोन फोटो, केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र व मूळ कागदपत्र तसेच सोबत प्रत्येकी दोन झेरॉक्स प्रती आणणे आवश्यक आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी या शिबिराचे व्यवस्थापन केले आहे. गरजूंनी या आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आटपाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश हंकारे व आटपाडी पंचायत समितीच्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ. साधना पवार यांनी केले आहे.


संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर