प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील हेच दुष्काळग्रस्तांचे खरे भगिरथ आहेत, खानापूर आटपाडीतून राष्ट्रवादीचाच आमदार – नामदार होण्यासाठी ना.जयंत पाटील यांनी येथून विधानसभा निवडणुक लढवावी असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंतरावजी पाटील यांच्या सूचनेनुसार ‘एक तास राष्ट्रवादी साठी’ या उपक्रमाच्या माध्यमातून आज आटपाडी येथे सादिक खाटीक यांच्या पुढाकाराने त्यांच्या निवासस्थानी गाव, प्रभाग भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . राज्यातल्या पाचव्या आणि आटपाडीतील चौथ्या गाव – प्रभाग भेटीच्या बैठकीवेळी सादिक खाटीक बोलत होते .
सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी तालुक्यांना कृष्णेचे पाणी मिळावे म्हणून सर्वप्रथमः लोकनेते राजारामबापू पाटील यांनी आवाज उठवला, संघर्ष केला आणि त्यांच्याच सुपुत्राने म्हणजे ना.जयंतराव पाटील यांनी, जिल्ह्यातल्या सर्व दुष्काळी तालुक्यांचा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी निर्णायक पावले टाकली असून जिल्ह्यातील एक ही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही असा निर्धार केला आहे.दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी ताकारी, म्हैशाळ, टेंभू आणि आरफळ या योजनातून जिल्ह्यातील बराचसा भाग ओलीताखाली येत होता.मात्र आटपाडी, कवठेमहंकाळ, जत,खानापूर, तासगांवसह माण , खटाव तालुक्यातील ११९ गावे कृष्णेच्या पाण्यापासून वंचित होती. त्या सर्वांना पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय ना.जयंतराव पाटील यांनी घेतला आहे. त्याबद्दल जयंतराव पाटील साहेबांचे खास अभिनंदन! साहेबांचे हे योगदान दुष्काळ ग्रस्तांच्या अनेक पिढ्या विसरणार नाहीत,असे सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले .
पिढ्यान पिढ्या प्रतिक्षा करणाऱ्या दुष्काळी भागातील जनतेचे, कृष्णेच्या पाण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या आधूनिक भगिरथ ना.जयंतराव पाटील साहेबांनी खानापूर विधानसभा ( आटपाडीसह विसापूर सर्कल ) मतदार संघातून निवडणूक लढवावी. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महत्वाचे मंत्री असल्याने मित्र पक्ष जयंतरावांसाठी ही जागा सोडून अन्यत्र जागा वाढवून घेतील . जयंतराव पाटील साहेबांच्या लढण्याने खानापूर आटपाडीचा आमदार राष्ट्रवादीचाच होईल आणि या मतदार संघाचे मंत्री पदाचे, आणि यदा कदाचित मुख्यमंत्री पदाचेही स्वप्न जयंतरावांच्या रूपाने सत्यात येवू शकेल . राज्याला हेवा वाटेल असा संपूर्ण जिल्ह्याचा विकासही होईल अशा भावना सादिक खाटीक यांनी बोलुन दाखविल्या.
आटपाडी, खानापूर तालुक्यासह सीमेलगतच्या असंख्य गावातील मोठ्या प्रमाणावर उत्पादित होणाऱ्या उसाचे तातडीने गाळप व्हावे आणि उत्तम दर दिला जावा , असा राज्यातला सर्वात मोठा म्हणून गणला जाणारा साखर कारखाना म्हणून, येथील माणगंगा सह .सा . कारखान्याला उर्जितावस्था दिली जावी अथवा राजारामबापू पाटील सह . सा . कारखान्याचीच मोठी शाखा – साखर कारखाना आटपाडी येथे उभारला जावा अशी मागणीही सादिक खाटीक यांनी यावेळी केली.
लोकराजा छत्रपती शाहु महाराज यांच्या काल झालेल्या स्मृतिशताब्दी दिनाच्या निमित्ताने शाहु महाराजांना अभिवादन करून सादिक खाटीक यांनी, जगात आणि भारतात प्रथमतः मागासांना आरक्षण देणारा राजा म्हणून छत्रपती शाहु महाराजांना जग ओळखते .विविध क्षेत्रांत अजोड कामगिरी करून सामाजिक सुधारणां बरोबरच छत्रपती शाहू महाराजांनी शेती आणि उद्योग धंद्यांनाही प्रोत्साहन दिले. सर्वार्थाने प्रजेचे हित जपणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक समतेसाठी आणि सामाजिक सलोख्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले असल्याचे सादिक खाटीक यांनी सांगीतले .
महिला युवक युवती कष्टकरी लोकांच्या हाताला काम मिळावे यासाठी राजारामबापू पाटील उद्योग समुहातील विविध उदयोग समुहातील विविध उदयोग आटपाडीत सुरु व्हावेत यासाठी ना . जयंतराव पाटील साहेबांकडे आपण जोरदार प्रयत्न करणार आहोत अशी भावना ही सादिक खाटीक यांनी बोलुन दाखविली .
महिला, युवक, युवती आणि अकुशल कामगार, मजुर यांच्या उपजिवीकेसाठी विविध महिला उद्योग, लिज्जत पापड युनिट , शेतमालावर प्रक्रिया करणारे उदयोग, गारमेंट, वेगवेगळी कारखानदारी आटपाडी येथे निर्माण व्हावी, आटपाडी खादी भांडार येथील ग्रामोद्योग मोठ्या प्रमाणावर सुरु व्हावा . या मागण्या यावेळी सौ रेश्मा बंडगर, सौ . मुमताज खाटीक, विकासराव देशमुख, बाळासाहेब उर्फ सलीम वंजारी यांनी नोंदविल्या .
आटपाडी शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवून ३ दिवसातून एकदा प्रत्येक कुटुंबाला पुरेसे पाणी मिळावे अशी मागणी सौ . उषा मोहनराव रसाळ यांनी केली तर आटपाडीतील शंकरराव हाके यांचे घर राजेंद्र पांडुरंग जाधव यांचे घरादरम्यानची गटर बंदिस्त करून या बोळात प्लेवीन ब्लॉक द्वारे रस्ता बनवला जावा आणि लाईट ची व्यवस्था केली जावी अशी मागणी सौ .गोकुळा शंकर हाके आणि शाबेरा आब्बास बेपारी यांनी केली .
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांची तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी प्रा . कविता म्हेत्रे (म्हसवड) यांची तसेच राज्य स्तरावरील अन्य महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या बद्दल त्यांचे अभिनंदन यावेळी करण्यात आले .
देश आणि राज्यातील जनतेने प्रचंड महागाई पासून वाचायचे असेल आणि खरे अच्छे दिन यायचे असेल तर भाजपला खड्या सारखे सत्तेवरून बाजूला सारा असे मत राष्ट्रवादीचे खटाव – आटपाडी तालुक्याचे विकासराव देशमुख यांनी व्यक्त केले .
यावेळी सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट मायणीचे चेअरमन श्री.विकासराव देशमुख आटपाडी, सामाजिक कार्यकर्ते शंकरराव आबा हाके, सामाजिक कार्यकर्ते असिफ उर्फ बाबू खाटीक, इन्नुस खाटीक, अमीर खाटीक, दीपक चव्हाण, राजु चव्हाण, अलंकार रसाळ, प्रमोद ऐवळे, अक्षय लवटे, संजय मोटे, संतोष जवळे, सुखदेव ऐवळे, श्रीधर वाघमारे, रॉमी शेख, शहबाज मुलाणी, कुर्बानहुसेन खाटीक, कलंदरबाबा खाटीक, सोहेल खाटीक, याशीन शेख ,बाळासाहेब ढगे, सोमनाथ जाधव, महेश सरगर, फय्याज खाटीक, सौ रेश्मा बंडगर, सौ . मुमताज खाटीक, शमा खाटीक, शाबेरा बेपारी, बेबी शेख, रशिदा खाटीक, राबीयाँबसरी खाटीक, इशरतजहाँ खाटीक, सौ उषाताई रसाळ, सौ कोंदनबी शेख, श्रीमती तायराबी खाटीक, गंगुताई करडे, गोकुळा हाके, सविता गायकवाड, वैष्णवी गायकवाड, अंकिता देशमुख, उज्वला केंगार, सानिका चपणे, श्रद्धा हाके, मयुरी नांगरे शुभागी जवळे, इत्यादी अनेक जण उपस्थित होते .
प्रारंभी असिफ उर्फ बाबू खाटीक यांनी स्वागत केले तर आभार सलीम उर्फ बाळासाहेब वंजारी यांनी मानले .


संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन