‘शेंडी तुटो,नाहीतर पारंबी तुटो’ विजयाचे साक्षीदार आम्हीच!: हैबतराव पावणे

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या कारभारावर बोलताना विरोधकांनी बँकेचा इतिहास अभ्यासून बोलावे. कारण आपल्या नेत्यांनी बँकेच्या कारभारात केलेली कामगिरी आपणा सर्वांना ज्ञात आहे. एकेकाळी २१ टक्के व्याज दराने सभासदांच्या व्याज वसुली बँकेच्या माध्यमातून घातली होती. त्यावेळी पठाणी व्याजदराने लूट करण्यात आली, हा इतिहास आहे व ही गोष्ट आपण प्रथम लक्षात घ्यावी. आपले बालिश वक्‍तव्य बंद करावे असा इशारा प्राथमिक शिक्षक बँकेच्या विरोधकांना जिल्हा आदर्श शिक्षक हैबतराव पावणे यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, पुरोगामी सेवा मंडळाने अर्थात प्राथमिक शिक्षक समितीने सभासदांच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत. त्यापैकी पहिला ऐतिहासिक निर्णय म्हणजे व्याजाचे दर टप्प्याटप्प्याने कमी केलेले आहेत. आज जामीनकी कर्ज नंबर २ चा व्याजाचा दर ९.९० टक्के इतका केलेला आहे. हा व्याजदर इतका कमी करताना सहा ते सात वेळा कमी करावा लागला, याचे श्रेय अभ्यासू चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाला जाते. एवढेच नव्हे तर सर्व सभासदांचे व राज्य नेते विश्वनाथ मिरजकर अण्णांचे स्वप्न म्हणजे व्याजाचा दर भविष्यकाळातही कमी होणार आहे, हा भाग समजून घेणे गरजेचे आहे. आपण सत्तेत असताना कधीही व्याजाचा दर कमी केला नाही, केला असेल तर पुरावा घेऊन समोर यावे. टीका करायचे धंदे बंद न केल्यास सभासद तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असेही ते म्हणाले.
भ्रष्ट कारभारावर पांघरूण घालण्याचा विषय सत्ताधारी संचालक मंडळाने ठेवलाच नाही. कारण कायमठेवी सभासदांना परत केलेल्या आहेत. निष्कर्जी सभासदाचा मृत्यू झाला तर तीन लाख रुपये,डीसीपीएस धारकांना पाच लाख रुपये व नियमित सभासदांना २० लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी निर्णय, यासारखे कितीतरी चांगले निर्णय सभासदांच्या कल्याणासाठी घेतलेले आहेत. हे उघड्या डोळ्यांना दिसत नाही का? असा फटकाही पावणे यांनी लगावला.
निवडणुकीच्या तोंडाचा विषय सोडून द्या, सत्तेत आल्यापासून आत्तापर्यंतच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाने व्याजाचा दर कमी करण्याचा विडा उचललेला आहे.त्याप्रमाणे सुनियोजित कार्यवाही चालू आहे. कोण कोणाला गाजर दाखवत आहे हे सभासद ओळखून आहेत, हेही विरोधकांनी ध्यानी घ्यावे.
टीका करणाऱ्यांनी आधी आपल्या नेत्याच्या भूतकाळातील कारभार उघडून बघावा, तर आणि तरच सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे. आपण ‘खोटे बोल पण रेटून बोल’ हा उद्योग बंद करावा अन्यथा सुज्ञ सभासदांकडून वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला.
पायाखालची वाळू कोणाच्या सरकायला लागली आहे? हे सांगायची आवश्यक नाही.कारण आपला सभासद बांधव सुजाण, जागरूक मतदार आहे. त्यामुळे तो सगळे ओळखून आहे. आपल्या टीकेने फायदा होण्याऐवजी तोटा मात्र ठरलेला आहे. आता कोणीही पहिल्यासारखे अज्ञान राहिलेले नाही. त्यामुळे टीका करताना अगोदर विचार करावा, असेही म्हणाले.

यावेळी प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन यु.टी. जाधव, तालुका अध्यक्ष संजय कबीर, सरचिटणीस नानासाहेब झुरे, माजी तालुकाध्यक्ष शामराव ऐवळे, माजी विभागीय अध्यक्ष दीपक कुंभार, जिल्हा कोषाध्यक्ष सचिन देठे, जिल्हा सहचिटणीस उन्मेश शेटे, माजी संचालक प्रकाश विभुते व सिद्धार्थ कटरे, शाहू फुले आंबेडकर रुग्णालयाचे संचालक श्रीकांत कुंभार व बाबासाहेब शेख, सत्यजित भांबुरे, शिवाजी खताळ, इन्ताब इनामदार, विजय पवार, हरिदास जावीर, सत्यवान माने, अजय राक्षे, सतीश मदने, माजी जिल्हा उपाध्यक्ष धनाजी देठे, किशोर पिसे, भीमराव सावंत, शिराज तांबोळी, विश्वास पुजारी, गेजगे, सासणे, ज्योतीराम सोळशे, वामन सोळंकी, संतोष पिसे,सचिन त्रिगुणे,सतिश पुसावळे, मुख्याध्यापक रमेश हेगडे, यशवंत मोरे, सर्जेराव पुजारी, सुभाष सुतार,रविंद्र सावंत, बाळासाहेब साळुंखे, इत्यादी उपस्थित होते.
समितीचे सैनिक काही झाले तरी सभासदांच्या हितासाठी व कल्याणासाठी बँकेतील व्याजाचा दर आणखी खाली आणण्यासाठी ‘शेंडी तुटो, नाहीतर पारंबी तुटो’ विजयाचे साक्षीदार व्हायचे असे पक्के ठरलेले आहे. यासाठी सभासदांचे आशीर्वाद, केलेल्या कामातून सदैव आमच्या पाठीशी आहे,यात तिळमात्र शंका नाही.त्यामुळे विरोधक मंडळींनी आपल्या ऐपतीप्रमाणे व अवकातीप्रमाणे टीका करावी, अव्वाचीसव्वा टीका खपवून घेतली जाणार नाही,असा इशाराही त्यांनी दिला.