आटपाडी येथील देशमुख महाविद्यालयात जाती प्रमाणपत्र पडताळणी विशेष मार्गदर्शन शिबीर संपन्न

अमित पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी :

महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगली यांचे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.६ एप्रिल ते १४ एप्रिल २०२२ या कालावधीत संपन्न होत असलेल्या ‘सामाजिक समता सप्ताह’ निमित्त श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडी येथे जात प्रमाणपत्र पडताळणी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये वरिष्ठ लिपिक तुकाराम थोरात,सांगली व प्रकल्प सहाय्यक राहुल कांबळे,सांगली हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय लोंढे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घघाटन करण्यात आले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. प्रा.सचिन धुकटे यांनी स्वागत केले. पांडुरंग नाईकनवरे यांनी प्रस्ताविक केले.या शिबिरामध्ये जवळपास दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते.
उद्घाटनपर मार्गदर्शनामध्ये डाॅ.विजय लोंढे म्हणाले की, हे जात प्रमाणपत्र पडताळणी शिबिर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पुढील करिअरसाठी अत्यंत महत्त्वाचे असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांनी आपली जात प्रमाणपत्र पडताळणी करून घेणे खूप गरजेचे आहे. यावेळी त्यांनी संस्था आणि महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना संबोधित केले.
जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगलीचे प्रकल्प सहाय्यक राहूल कांबळे व वरिष्ठ लिपिक तुकाराम थोरात यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थी – विद्यार्थिनींना स्वतःची जात प्रमाणपत्र पडताळणी करून घेणे का गरजेचे आहे. याविषयी सखोल मार्गदर्शन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त संपन्न होत असलेल्या सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत या शिबिरामध्ये जास्तीत – जास्त विद्यार्थ्यांनी आपली जात प्रमाणपत्र पडताळणी करून घ्यावी असे आवाहन केले. इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्गांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्र असणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले.
डिजीटल पॅनल बोर्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी जवळपास साठ विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष फॉर्म भरून घेण्यात आले. प्रा.प्रवीण पाटील यांनी आभार मानले.