महागाई विरोधात जतमध्ये काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत :

केंद्र शासनाने डिझेल, पेट्रोल, गॅस व इतर जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ ताबडतोब कमी करून सामान्य नागरिकांची होणारी होरपळ थांबवावी, या मागणीसाठी आज जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले व केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी बोलताना आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की, केंद्र सरकारच्या अन्यायकारक नीतीमुळे देशामध्ये महागाई वाढत असून डिझेल, पेट्रोल, गॅस व इतर जीवनावश्यक वस्तूंची भाव वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. सामान्य माणसाचे या दरवाढीने आर्थिक नियोजन पूर्णपणे ढासळले आहे. खाद्यतेल, डाळी, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्याने महिलावर्गास त्याचा त्रास होत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतुकीचे दर वाढल्याने त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेस होत आहे.
केंद्र शासनाने डिझेल, पेट्रोल, गॅस व इतर जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ ताबडतोब कमी करून सामान्य नागरिकांची होणारी होरपळ थांबवावी. याची प्रशासनाने दखल घेऊन याबाबत केंद्र शासनास कळवावे. अन्यायकारक दरवाढ केंद्र शासनाचे माघार घेतली नाही, तर येणाऱ्या काळात आणखी तीव्र आंदोलन करणेत येईल.
यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष आप्पा राया बिराजदार,जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील,जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील, सुजय (नाना) शिंदे, तुकाराम माळी, विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड.युवराज निकम, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,माजी नगरसेवक परशुराम मोरे,तसेच काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.