आटपाडी येथील राजारामबापू हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभचिंतक व निरोप

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
कोरोना रोगाच्या साथीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना मोबाईलद्वारे ऑनलाइन शिक्षण घेण्याची वेळ आली.या ऑनलाइन शिक्षण घेण्यामुळे मुलांचा अत्यंत लहान वयात मोबाईलशी संपर्क आला.ज्यांना मोबाईल नव्हते, त्यांनी हट्ट करून ऑनलाईन शिकण्यासाठी मोबाईल घेतले. परंतु शिकण्यापेक्षा मोबाईलमध्ये गेम खेळण्यामध्येच विद्यार्थ्यांना गोडी लागली. त्यामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आणि मुलांना नाही त्या चुकीच्या सवयी लागल्या. त्यामुळे अशी परिस्थिती पुन्हा विद्यार्थ्यांवर येऊ नये,असे मी परमेश्वराला प्रार्थना करतो, असे भावपूर्ण उद्गार माजी प्राचार्य जी. आर.चव्हाण यांनी राजारामबापू हायस्कूलच्या आटपाडी येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्याच्या समारंभामध्ये काढलेे.
ते पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची भीती कधी घालू नये. स्पर्धेसाठी शिक्षण घेण्यापेक्षा बुद्धिमान आणि गुणवान होण्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे.त्यातून स्पर्धा आपोआप जिंकल्या जातील. त्यासाठी वेगळे काही करावे लागणार नाही. विद्यार्थ्यांनी गुणवान बनावे अशी भावना विद्यार्थ्यांच्या प्रति चव्हाण सरांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भवानी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन रावसाहेब पाटील होते. सुरुवातीला विद्यार्थी, मुख्याध्यापक व विद्यार्थिनी, उपमुख्याध्यापिका यांनी सर्वांचे स्वागत केले. याप्रसंगी अनेक मुला-मुलींनी व शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली. शेवटी एक दिवसासाठी मुख्याध्यापक बनलेले विद्यार्थी अक्षय पाटील यांनी सर्वांचे आभार मानले व विद्यार्थ्यांचा निरोप देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.