माडगुळेत राजेंद्रअण्णांचा गटच ठरला ‘भारी’, विकास सोसायटीवर पुन्हा बसले सत्ताधारी !

नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क / माडगुळे :

माडगुळे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया आज पार पडली.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून ते निवडणुका पार पडण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विरोधक व सत्ताधारी गटामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात होत्या. याला आज पूर्णविराम मिळाला.
विरोधकाच्या मागणीनुसार पूर्ण मतदान व्हिडिओ चित्रीकरणात पार पडले. मात्र विरोधकांनी मतदानावर टाकलेल्या बहिष्काराला न जुमानता मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
एकूण ७०% मतदान झाले, माडगुळे विकास सेवा सोसायटीवर राजेंद्रअण्णा देशमुख गटाची गेली ४० वर्ष एक हाती सत्ता आहे. सत्ताधारी श्री खंडोबा शेतकरी विकास आघाडीने पूर्ण ताकतीने यावर्षी सत्ता राखण्याचा प्रयत्न केला व त्याला यश मिळाले.या पॅनेलला यापूर्वीच दोन जागा बिनविरोध मिळाल्या होत्या. त्यामुळे एकूण११ जागांसाठी मतदान झाले.विरोधकांनी सत्ताधारी पार्टीवर केलेल्या बिनबुडाच्या आरोपाला मतदारानी केराची टोपली दाखवून सत्ताधारी गटाने सर्व ११ जागा मोठ्या फरकाने काबीज करून आपली पुन्हा एकहाती सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळवले.
सर्व विजयी उमेदवारांचा राजेंद्र (अण्णा )देशमुख यांनी सत्कार केला व विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले. सर्व सभासदांचे आभार मानले. विजयी उमेदवारांची गावातून गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत ढोल ताशा व हलगीच्या नादात मिरवणूक काढण्यात आली.