डॉ.रवींद्र आरळी यांना भाजपने दिली ‘केंद्रात’ संधी!

केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या महामंडळावर संचालक पदी निवड
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :

जत येथील प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ.रवींद्र आरळी यांची भारत सरकारच्या केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या महामंडळावर संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.हे पद राष्ट्रीय स्तरावरचे असून सांगली जिल्ह्यातील पहिले संचालक पद डॉ. आरळी यांना मिळाले आहे.
डॉ. रवींद्र आरळी यांना केंद्रातील मिळालेल्या पदामुळे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.डॉ.आरळी प्रदेश भाजपाचे वैद्यकीय सेल आघाडीचे राज्य उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. भारत सरकार केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय अंतर्गत सिमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालक पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारचे उपसचिव बी.पी.सतापथी यांनी या निवडीचे पत्र पाठवले आहे.
सिमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.डॉ.आरळी यांना स्वतंत्र कार्यभार असलेल्या संचालक पदावर तीन वर्षासाठी नियुक्त केल्याचे पत्रात नमूद केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा,भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा,केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडे ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी डॉ.आरळी यांना राष्ट्रीय स्तरावर कामाची संधी दिली आहे.
पंतप्रधान कार्यालयातून डॉ.आरळी यांची नियुक्त करण्यात आल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रीय स्तरावर झालेल्या नियुक्तीमुळे सांगली जिल्ह्यातील भाजपला उभारी मिळाली आहे.दरम्यान डॉ.आरळी यांच्या निवडीबद्दल तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.