जतमध्ये गुरुवारी भाजप करणार ‘बोंबाबोंब’ !

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जतचे तहसीलदार,संखचे अप्पर तहसीलदार पद हे रिक्त आहे.जत तहसीलदारपदी जीवन बनसोडे यांचा नियुक्ती आदेश आलेले असताना आ.विक्रमसिंह सावंत हे त्यांच्याच मर्जीतील अधिकारी हवेत म्हणून त्यांना रुजू होवू देत नाहीत.याचा फटका जतकरांना बसत आहे.त्याच्या निषेधार्थ गुरुवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर भाजपच्यावतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पवार यांनी दिली.
भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पवार,भाजयुमोचे जिल्हाउपाध्यक्ष संग्रामसिंह जगताप,माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत,भाजपचे शहराध्यक्ष अण्णा भिसे,सद्दाम अत्तार, गौतम ऐवळे,अय्युब सय्यद यांनी यासंदर्भात प्रांताधिकारी,उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ८ ऑगस्ट,२०२१ रोजी जतच्या तहसीलदारपदासाठी जीवन बनसोडे यांच्या नावाने शासकीय आदेश निघाले.नियुक्ती आदेश निघून महिना झाला तरी ते हजर झाले नाहीत.संखच्या अप्पर तहसीललाही कुणी वाली नाही.दोन्ही प्रमुख महसूल कार्यालये ठप्प आहेत,निर्णय होत नाहीत. स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्या मर्जीतील अधिकारी आणण्यास इच्छुक आहेत.ज्या अधिकाऱ्यांची तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली, त्या बनसोडे यांना हजर करून न घेता स्थानिक लोकप्रतिनिधींनी शिफारस केलेल्या अधिकाऱ्यालाच तहसीलदार म्हणून आणण्यासाठी तालुक्यातील तमाम जनतेची गळचेपी सुरु केली आहे.