

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/पुणे:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी-बारावी पुरवणी परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.दहावीची पुरवणी परीक्षा २२ सप्टेंबरपासून, तर बारावीची परीक्षा १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दोन्ही परीक्षा लेखी स्वरूपात होणार आहेत.परीक्षेचे वेळापत्रक राज्य मंडळाच्या http://mahahsscboard.in/ वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. मात्र या निकालातही अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांची आता नियमित लेखी परीक्षा होणार आहे.त्यानुसार या लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
दहावीची परीक्षा २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होणार असून बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.
व्यवसाय अभ्यासक्रम घेऊन बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होईल.
तत्पूर्वी दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा २१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होईल.बारावीची प्रात्यक्षिक,श्रेणी, तोंडी परीक्षा १५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.
२०२१च्या मुख्य परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ न शकलेल्या तसेच ए.टी.के.टी.साठी पात्र विद्यार्थ्यांची ही पुरवणी परीक्षा मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई,कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे विभागीय मंडळामार्फत छापील स्वरूपात देण्यात आलेले वेळापत्रक अंतिम समजण्यात येणार आहे. त्या वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य किंवा खाजगी यंत्रणेने छपाई केलेले, व्हाट्सअप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.
“पुरवणी परीक्षेला कमी विद्यार्थी प्रविष्ट होतात. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित नियम पाळून या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षा घेणे शक्य आहे. त्यानुसार पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाप्रमाणे परीक्षेची तयारी करावी.- डॉ. अशोक भोसले, सचिव – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश