माळशिरसमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाची चावी माणिकबापूंकडे कायम!


शिवतीर्थ बंगल्यावरील बैठकीला यश
तालुका अध्यक्ष व कार्यकारणीची स्थगिती उठवली

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिकबापू वाघमोडे यांनी तालुका कार्यकारणी जाहीर केल्यानंतर सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांनी तालुक्यातील नेत्यांच्या तक्रारी व कुरघोडीमुळे तालुका अध्यक्ष व कार्यकारणीला स्थगिती दिलेली होती. ही स्थगिती प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील यांच्या आदेशान्वये उठवलेली असल्याचे पत्र प्रसिद्धीमाध्यमांना दिलेले आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची चावी माणिकबापू वाघमोडे यांच्याकडे कायम ठेवलेली आहे.
शिवतीर्थ बंगल्यामधील बंद खोलीत प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, राज्य प्रवक्ते उमेश पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, सोलापूर जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक सुरेशराव घुले पाटील, जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, माळशिरस तालुक्याचे पक्षनिरीक्षक निरंजन भूमकर, पंढरपूरचे नगरसेवक सुडके यांच्या उपस्थितीत अॅड.सुभाषराव पाटील, फत्तेसिंह माने पाटील, डॉक्टर रामदास देशमुख, धैर्यशीलभाऊ देशमुख, पांडुरंगभाऊ देशमुख, शंकरनाना देशमुख, संकल्पभैया डोळस, गजानन पाटील, रमेशभाऊ पाटील, निजामभाई काजी, प्रभाकर इंगळे, देशमुख, मारुतीराव रेडे पाटील ,अशोकराव गायकवाड, आदी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची एक तास बंद खोलीत बैठक झाली. माळशिरस तालुक्यामध्ये राष्ट्रवादीची दुफळी निर्माण झालेली होती. त्या अनुषंगाने तालुक्यातील तक्रारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्याकडे गेल्या. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे सरचिटणीस शंकरनाना देशमुख यांच्या निवासस्थानी घेतलेल्या तालुक्यातील निष्ठावान पदाधिकाऱ्यांची व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या तासभराच्या बंद खोलीतील बैठकीकडे लक्ष लागून राहिलेले होते.
शिवतीर्थ बंगल्यात राजकीय खलबते झाली असल्याने माणिकबापू वाघमोडे यांना पुन्हा तालुका अध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळालेली आहे. माणिकबापू वाघमोडे यांनी प्रतिकूल परिस्थितीत माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळलेली होती. त्यांना शिवतिर्थवरील बैठकीमधील सर्व नेत्यांनी साथ दिलेली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची बुधवारी भेट घेऊन सविस्तर चर्चा करून तातडीने स्थगिती उठविण्याचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना सांगितले होते. जयंतराव पाटील यांनी गुरुवारी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्याशी संपर्क साधून स्थगिती उठवलेली आहे. यामुळे पुन्हा माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची माळ माणिकबापू वाघमोडे यांच्या गळ्यामध्ये घातलेली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान गोटामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.