बेंदूर सणावर कोरोनाचे सावट! कवठेमहांकाळ तालुक्यात बेंदूर साध्या पद्धतीने साजरा!

शिवाजी ओलेकर
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/कवठेमहांकाळ:

वर्षभर आपल्या शेतकरी राजाला शेतामध्ये मदत करणाऱ्या बैल राजाला एक दिवस विश्रांती देऊन त्याला सजवून मिरवणूक काढण्याचा सण म्हणजे बैल पोळा! शेतकऱ्यांचा सखा अथवा मित्र असणाऱ्या बैलाप्रती आदरभाव आणि स्नेह निर्माण करणाऱ्या सर्जा राजाचा सण असलेला बैल पोळा आज कोरोनाच्या सावटाखाली साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
तालुक्यातील ग्रामीण भागातील अलकुड एस,धुळगाव,रांजनी, बसप्पाची वाडी,कोकळे, नांगोळे,ढाळगाव, सह इतर भागात आज शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोडीला सजवून, त्याची मनोभावे पूजा केली.प्रत्येकवर्षी बैल पोळा सणाला गावातून सर्जा राजाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येत होती.मात्र यावर्षी कवठेमहांकाळ तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने या सणावर त्याचा परिणाम दिसून आला.यामुळे शेतकरी वर्गातून थोडी निराशा दिसून येत होती.
कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये असणारा बेंदूर हा सण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. तर बैलांकडून कर तोडण्याच्या असणाऱ्या प्रथेला इतिहासामध्ये दुसऱ्यांदा खो बसला आहे. बेंदूर सणावेळी बळीराजा आपल्या जनावरांना अंघोळ घालून त्याला खाऊ पिऊ घालतो. त्याला सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते. परंतु मागील वर्षापासून कोरोनामुळे या समावर बंधने आली आहेत. त्यामुळे बेंदूर हा सण अगदी साध्या पद्धतीने साजरा केला गेला.