…अन्यथा आरपीआयला वेगळा विचार करावा लागेल:जिल्हाध्यक्ष संजयराव कांबळे


अनिल मदने

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत नगरपरिषदेच्या स्विकृत सदस्यपदी आर.पी.आय.उमेदवाराला यावेळी संधी द्यावी अन्यथा येणारे स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजयराव कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना  दिला आहे.     संजय कांबळे म्हणाले, आमचे नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री  रामदास आठवले यांच्या आदेशाची आम्ही काटेकोरपणे अंमलबजावणी करीत आलो आहोत.त्यांच्या सांगण्यावरून आम्ही प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भा.ज.प.च्या उमेदवाराचाच प्रामाणिकपणे प्रचार केला आहे. त्यामुळेच भा.ज.प.ला याचा प्रत्येक वेळी चांगलाच फायदा झाला आहे.    परंतु भा.ज.प.आपला मित्र पक्ष असलेल्या आर.पी आय.ला नेहमी महत्त्वाच्या नियुक्त्या, पदे व स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत सापत्नभावाची वागणूक देत आहे.     जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत आमच्या पक्षाने दोन जागा मागितल्या असताना केवळ एक जागा देऊन भा.ज.प.ने आमची बोळवण केली होती. या निवडणूकीत आम्ही भा.ज.प.च्या उमेदवारांचा प्रामाणिकपणे प्रचार केला होता.परंतु भा.ज.प.उमेदवार सौ सगरे यांनी आपला मित्र पक्ष असलेल्या उमेदवाराचा प्रचार केला नाही. तरीही आमच्या उमेदवाराला नगरपरिषद निवडणुकीत चारशे मते मिळाली होती.     आता जत नगरपरिषदेत भा.ज.प.च्या वतीने स्विकृत नगरसेवकाची निवड करण्यात येणार आहे. भा.ज.प.चे यापूर्वीचे स्विकृत नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत यानी त्यांच्या स्विकृत नगरसेवक पदाचा नुकताच राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर भा.ज.प.नेतृत्वाने आर.पी.आय.आठवले गटाच्या उमेदवाराला संधी देऊन मैत्रीला जागावे अन्यथा येणारे स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशाराही कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.