कोरोनाने अद्दलच घडवली! जीवनशैली बदलली!

कोरोनामुळे जीवनशैली बदलली !

युवा वर्ग देतोय व्यायामाला महत्त्व ; व्यायामासाठी सायकलींचा वापर वाढला!

अनिल मदने

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

कोरोना आणि लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा तरुण, युवावर्ग यासह अनेकांची जीवनशैली बदलत असून कुठलाही आजार होऊ नये म्हणून आहार-विहार व नियमित व्यायाम यावर भर देत आपले शरीर फिट राहिले पाहिजे यादृष्टीने आरोग्याला महत्त्व देत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक तरुणांचा धास्तीने बळी गेला. तर अनेक वृद्ध, वयस्कर व्यक्ती आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर बरे होऊन घरी परतले. घरातल्या घरात व्यायाम करायचा म्हणजे कंटाळा! सध्याच्या कठिण परिस्थितीत प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित व्यायाम, चांगला आहार व झोप या त्रिसूत्रीचा अवलंब करत आहेत. शहरातल्या अनेक ठिकाणच्या हायस्कूल व कॉलेजमधील मैदानाच्या ट्रॅकवर तरुण वर्ग धावताना दिसत असून सकाळच्या वेळेस मॉर्निंग वॉक, सूर्यनमस्कार, योगासने व जिममध्ये कोरोनाच्या सावटामुळे तरुण वर्ग फिटनेस वाढवण्याच्या प्रयत्न करत आहे.     त्याचबरोबर सायकलिंगचाही वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एकूणच कोरोनाने जीवनशैली बदलली असून युवा वर्ग फिटनेसबाबत जागृत होऊन नियमित व्यायामाला महत्त्व देत आहे.