गर्दी उसळतेय!जत शहरात कोरोनाची पुन्हा भीती!

अनिल मदने

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत: 

कोरोना रुग्णांची संख्या कमी  होत असल्याने राज्य शासनाने सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, शासनाने नियमात शिथिलता देताच नागरिक बाजारात मुक्त संचार करताना दिसून येत आहेत. यामुळे पुन्हा कोरोना वाढणार तर  नाही ना? अशी भिती व्यक्त होत आहे.दरम्यान,अनलॉकनंतर आता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक उपाययोजनांची गरज आहे. प्रशासनाने नियमात शिथिलता देताच शहरातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांकडून सामाजिक अंतराचे पालन व मास्क वापर होताना दिसून येत नाही.खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहेत. एकाच माणसाची खरेदीसाठी आवश्यकता असतानादेखील परिवारातील अनेक सदस्य विनाकारण बाजारपेठेत गर्दी करतानाचे चिंताजनकही चित्र आले.   जिल्ह्यासह जत तालुक्याची कोरोना रुग्णांची संख्या दररोज कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे.त्यामुळे नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याची गरज आहे.नगरपालिका, पोलीस प्रशासनाने अनलॉक प्रक्रिया सुरू होताच कारवाईची संख्या कमी केली आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा धोका पाहता कारभारासाठी पथके तैनात करण्याची गरज आहे.कोरोनाच्या संचारबंदीदरम्यान पोलीस प्रशासनाकडून शहरातील मुख्य चौकात कसून चौकशी करण्यात येत होती.मात्र, शिथिलता मिळताच अनेक वाहतुकीचे नियमसुद्धा विसरले असून, ट्रिपल सीट विनामास्क फिरताना नागरिक दिसून येत आहेत. तसेच पानटपऱ्यांसह चहाच्या दुकानांवरही गर्दी होताना दिसून येत आहे.