पवारांनी ‘येडं पेरलं,अन् खूळं उगवलं’,असं ठाकरे सरकार

आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:

आघाडी सरकारच्या नावाखाली पवारांनी ‘येडं पेरलं, अन् खूळं  उगवलं’, असे ठाकरे सरकारचे एकंदरीत झाले आहे. शासनाच्या फसव्या योजनांच्या मालिकांमधील कोरोणामुक्त गाव ही एक फसवी योजना राज्य सरकारने घोषित केली आहे,अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी कोरोनामुक्त गाव स्पर्धेवरून केली आहे.राज्य शासनाने कोरोनामुक्त गावासाठी नव्याने स्पर्धा जाहीर केली आहे त्यासाठी बक्षीस योजना ठेवली आहे. यावरून त्यांनी खरपूस समाचार घेतला.आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, “आघाडी सरकारच्या नावाखाली पवारांनी येडं पेरलं, अन् खूळं  उगवलं, अशी ठाकरे सरकारचे एकंदरीत झाले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोरोनाने आणि लाॅकडाऊनमुळे पूर्णपणे मोडून पडला आहे.कितीतरी कर्ती माणसे, घराची प्रमुख माणसे या कोरोणाने मृत्युमुखी पडली आहेत. यांना आधार द्यायचं या सरकारला जमलेच नाही,परंतु अशा स्पर्धा भरवून गावाची थट्टा या सरकारने लावली आहे. सगळं गावंच करील, तर मग सरकार काय करेल? या मंत्र्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की, तुम्ही नेमकं जबाबदारी दुसऱ्यावर टाकून स्वतः नेमकं काय करणार आहे ?कोरोनाची स्पर्धा नेमकी या कामचुकार मंत्र्यांनी का भरवली आहे? या योजनेच्या सगळ्या व्यवस्थापनामागे निकष लावले आहेत, त्या निकषांमध्ये या सरकारला-वसुली सरकारला-शून्य मार्क पडत आहेत. या योजनांच्या व्यवस्थापनामध्ये, 22 निकषांमध्ये व्यवस्थापन करण्यासाठी आणि या पथकांसाठी कोणताच निधी धरला नाही, हे सोईस्करपणे या सरकारने अंधारात ठेवले आहे.याच्यासाठी कोण निधी देणार? याची सुस्पष्टता या जीआर मध्ये नाही. खरं तर पन्नास लाख रुपये बक्षीस देणार-कोरोनामुक्त गावाला-ही घोषणाच मला फसवी वाटते,याच्यामध्ये साशंकता वाटते. कारण पूर्वी पत्रकारांच्यासाठी सरकारने एक जीआर काढला होता की पत्रकारांचा मृत्यू झाला, तर पन्नास लाख रुपये आम्ही देणार! पत्रकारांना 50 लाख रुपये तर दिलेच नाहीत! परंतु त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेणे यांना जमलं नाही! अशाच फसव्या योजनांच्या मालिकांमधील ही एक फसवी योजना राज्य सरकारने घोषित केली आहे.त्याचा हा एक भाग आहे.”