सावधान! लहान मुलांनाही धोका?

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/मुंबई: 

कोरोना होऊन गेल्यानंतर लहान मुलांना ‘मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम’ ची बाधा होत आहे. नागपूरमध्ये लहान मुलांनाही या नव्या आजाराची लागण झाली असून त्याचे 30 रुग्ण आढळून आले आहेत.या प्रकारामुळे लहान मुलांमध्ये विविध विकार होताना दिसत आहेत. यामुळे एका बालकाचा मृत्यूही झाला आहे.मृत्यू झालेल्या रुग्णाला ब्रेन ट्यूमर झाल्याची माहिती पुढे आली आहे. अमेरिका व युरोपमध्ये हा आजार फैलावत असताना आपल्याकडेही याचा प्रसार होत असल्याचे समोर आले आहे.

कोरोना संक्रमण झाल्यानंतर दोन ते सहा आठवड्यांनी ‘मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम’ ची लक्षणे जाणवू लागतात. यासाठी ताबडतोब वैद्यकीय सल्ल्याची गरज असते.मुलांच्या पालकांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,अशा सूचना देण्यात आल्या आहेत.कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्यूकरमायकोसिसचा धोका वाढत असतानाच कोरोनातून बरे होऊन गेल्यानंतर लहान मुलांनाही ‘मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम’ च्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असतानाच यानंतर तीन-चार महिन्यानंतर तिसऱ्या लाटेचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका होण्याची शक्यता केंद्रसरकारच्या सल्लागारांनी व्यक्त केली आहे.त्यामुळे बालकांच्या पालकांची चिंता वाढली आहे. देशात अद्यापही लहान मुलांना लस उपलब्ध झालेली नसल्यामुळे लहान मुलांना आता सर्वाधिक धोका आहे.

मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम’ या समस्येमध्ये लहान मुलांच्या हृदय, फुफ्फुस, मेंदू,डोळे,किडनी यासारख्या महत्त्वाच्या अवयवांना सूज येते.परंतु आत्तापर्यंत कोविड-19 व एमआयएसमध्ये संबंध असल्याबाबत  स्पष्टता नाही. परंतु ‘मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम’ ने बाधित बालकांना अवयवांना सूज आलेल्या आजारांच्या लक्षणांचा सामना करावा लागतो.तर एमआयएस-सी ने पीडित बालकांच्या श्वसन ,पचन व त्वचा संस्थेवर परिणाम होतो. ताप, पोटदुखी, सतत उलटी अशीही लक्षणे आढळतात. या सर्व समस्यांना तोंड देण्यापेक्षा प्रतिबंध म्हणून बालकांची काळजी घेतलेलीच बरी!