ई-मेल द्वारे जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /सांगली:
मार्च 2020 पासून संपूर्ण देशात कोरोना महामारीचा संसर्ग सुरू झाला. डॉक्टर ,पोलीस ,आरोग्य कर्मचारी यांच्या खांद्याला खांदा लावून या कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्याच्या कार्यात राज्यातील शिक्षकांनी मोठे योगदान दिले. कुटुंब सर्वेक्षण ,संस्था विलगीकरण कक्ष, रेशन दुकानावर धान्य वाटप करण्यास मदत, कोविड कॉल सेंटर ,कोविड लसीकरण केंद्र, चेक पोस्ट अशा अनेक ठिकाणी प्रामाणिकपणे शिक्षकांनी कार्य केले. याबरोबरच ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले.तसेच पोषण आहाराचे तांदूळ व धान्यादी मालाचे विद्यार्थ्यांना घरपोच वाटपही केले. हे सर्व करत असताना गेली वर्षभर शिक्षकांना दिवाळी सुट्टी व उन्हाळी सुट्टी मिळाली नाही. 30 एप्रिल 2021 रोजी शासनाने 1मे ते 13 जून पर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पण कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही शिक्षकांनी आपले मुख्यालय सोडू नये असा शिक्षण विभागाने आदेश काढला आहे. पर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षण सेवकांना गावी जाण्यासाठी परवानगी मिळावी,अशी मागणी शिक्षक संघाने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. कोरोना संसर्ग आपत्ती निवारण कार्यात कोणतीही बाधा न येता 1 मे ते 15 जून या कालावधीत स्थानिक शिक्षकांना रोटेशन नुसार नियुक्ती देण्यात यावी. हे नियोजन करत असताना शिक्षण सेवकांना कोणतेही विमा संरक्षण नसल्यामुळे त्यांना पूर्णपणे या कार्यातून वगळण्यात यावे, पर जिल्ह्यातील शिक्षकांना या उन्हाळी सुटीच्या काळात आपल्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी देण्यात यावी. 15 जूननंतर सदर शिक्षकांना पुन्हा कोरोना संसर्ग रोखण्याकामी नियुक्त करण्यात यावे. 53 वर्षावरील शिक्षक, बीपी,शुगर,अस्थमा,गंभीर आजार असणारे शिक्षक,गरोदर माता व स्तनदा माता यांना शक्यतो या कार्यातून सूट देण्याबाबत विचार व्हावा, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद सांगली च्या अध्यक्षा प्राजक्ताताई कोरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, शिक्षण सभापती आशाताई पाटील ,मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी व शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांना ई-मेल द्वारे पाठविण्यात आले. हे निवेदन देण्यासंदर्भात शिक्षक संघाच्या ऑनलाइन मीटिंगमध्ये चर्चा झाली.यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ जुनी पेन्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील पाटील, जिल्हा नेते जगन्नाथ कोळपे, पार्लमेंटरी बोर्ड अध्यक्ष विजयकुमार चव्हाण, पार्लमेंटरी बोर्ड सदस्य मधुकर जंगम, जिल्हाध्यक्ष अमोल माने ,जिल्हा सरचिटणीस राहुल पाटणे, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप खोत, जिल्हा कोषाध्यक्ष मारुती देवडकर ,जिल्हा उपाध्यक्ष विलास कदम ,जिल्हा प्रवक्ते उत्तम पाटील यांच्यासह तालुका अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश