शिक्षकांच्या प्रश्नांसाठी जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाने घेतली बिडीओची भेट सकारात्मक चर्चा; शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याची दिली ग्वाही

अनिल मदने

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या (शि.द) शिष्टमंडळाने जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांना निवेदन देत चर्चा केली. गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून तात्काळ गटशिक्षणाधिकारी यांना बोलावून तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष  जैनुद्दीन नदाफ,तालुका सरचिटणीस,गुंडा मुंजे, तालुका संघटक विष्णू ठाकरे यांनी जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांची भेट घेतली. तालुक्यातील प्रथमिक शिक्षकांच्या आयकर विषय मार्गी लावावा, जिल्हा परिषद शाळांच्या न्यायप्रविष्ठ जागे संदर्भात न्यायालयीन कामकाज पाहणेकामी सरकारी वकिलांची नेमणूक करावी, प्राथमिक शाळांच्या भौतिक सुविधा ग्रामपंचायत निधीतून पूर्ण कराव्यात, उमदी केंद्रातील प्राथमिक शिक्षकांचा पगार उशिरा होतो तो वेळेत व्हावा, धोकादायक शाळा दुरुस्त कराव्यात, जिल्हा परिषद शिक्षक बदली धोरण निश्चित करावे, तालुक्यातील शिक्षकांची वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीनुसार प्रस्ताव पाठवावेत, शिक्षण सेवक,दिव्यांग शिक्षक ,महिला शिक्षक व पन्नास वर्ष वय असणाऱ्या शिक्षकांना  कोविड कामाचे आदेश देऊ नयेत अशी अपेक्षा तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी व्यक्त केली.शिक्षक संघांच्या या मागणीची दखल घेत बीडीओ धरणगुत्तीकर यांनी तात्काळ गटशिक्षणाधिकारी यांना बोलावून घेतले.  शिक्षकांच्या आयकराचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावा, शाळेच्या न्यायालयीन कामकाजासाठी वकिलाची नेमणूक करण्याबाबत संबंधित विभागाला पत्र व्यवहार करावा, उमदी केंद्रातील प्राथमिक शिक्षकांचा पगार वेळेत करावा, शिक्षकांची वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीनुसार प्रस्ताव तात्काळ पाठवावेत अशा सूचना बीडीओ धरणगुत्तीकर यांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिल्या.  शाळा सुधारण्यासाठी ग्रामपंचायतीने अधिकाधिक निधी खर्च करावा, यासाठी आपण स्वतः सर्व ग्रामपंचायतीना लेखी सूचना देऊ अशी ग्वाही बीडीओ धरणगुत्तीकर यांनी संघाच्या शिष्टमंडळाला दिली.