पंढरीत कमळाई ‘समाधानी’, ‘भगीरथी’ प्रयत्न अपयशी!

पंढरपूर- मंगळवेढ्यात  3733 मतांनी समाधान आवताडे विजयी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/पंढरपूर:

राज्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या व प्रतिष्ठेचा ठरलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा निकाल आत्ताच संपूर्णपणे समोर आला.यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांना भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी तीन हजार 733 मतांनी चितपट केले. पंढरीनगरीत भाजपाची ‘कमळाई समाधानी’ झाली आहे, तर महाविकास आघाडीचे ‘भगीरथी प्रयत्न अपयशी’ ठरले आहेत.पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली होती. महाविकास आघाडी व भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची करून ठेवली होती. दोन्ही पक्षातील मातब्बर लोक प्रचारासाठी येऊन निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच गाजली होती.मतदानानंतर अनेक तर्क-वितर्क लढण्यात आले होते. आज या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला. पंढरपूर मधील पहिल्या एकोणीस फेऱ्यांमध्ये समाधान आवताडे यांनी 1741 मतांची बाजी मारली, याचवेळी निकालाचे चित्र स्पष्ट होऊन गेले. मंगळवेढा विभाग भाजपला आवाक्यात असल्यामुळे एकोणीस फेऱ्यानंतरच भाजपने आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. 38 व्या फेरीअखेर समाधान आवताडे यांनी एकंदर तीन हजार 733 मतांनी विजय मिळवला. त्यांना एक लाख, 9 हजार,450 मते मिळाली. तर भगीरथ भालके यांना एक लाख,पाच हजार, 717 मते मिळाली. अत्यंत चुरशीच्या या लढतीत भाजपाचे समाधान आवताडे यांनी विजय मिळवला. पाणीप्रश्न, कोरोना व्यवस्थापन यासारख्या मुद्द्यांचा झटका-फायदा झाला. गत निवडणुकीतही भारतनाना भालके हे सहा हजारांच्या आसपास मतांनी पंढरपूरमधून आघाडीवर होते. यावेळीही चुरस निर्माण झाली होती. परंतु पंढरपूरमधून भालके यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र स्पष्ट झाले. समाधान आवताडे यांच्या विजयाने पंढरी नगरीत भाजपाची ‘कमळाई समाधानी’ झाली आहे,तर महाविकास आघाडीचे ‘भगीरथी प्रयत्न अपयशी’ ठरले आहेत.